IND vs ENG 5th Test Day 2 Akash Deep Teases Ben Duckett : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच २२४ धावांवर आटोपला. त्यानंतर बेन डकेट आणि झॅक क्रॉउली या जोडीनं फलंदाजांसाठी मुश्किल वाटणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. बेन डकेट याने तर टी-२० स्टाइलमध्ये फटकेबाजी करत मोहम्मद सिराज आणि आकाशदीपची धुलाई केली. पण शेवटी आकाश दीपनं त्याचा वचपा काढला. १३ व्या षटकात इंग्लंडच्या धावफलकावर ९२ धावा असताना बेन डकेट आकाशदीपच्या जाळ्यात फसला. त्यानंतर आकाशदीपनं जी कृती केळी ती चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वचपा काढला; मग खांद्यावर हात टाकत दाखवला तंबूचा रस्ता
इंग्लंडच्या डावातील १३ व्या षटकात आकाशदीप गोलंदाजील आला. स्ट्राइकवर असलेल्या बेन डकेटनं पुन्हा एकदा त्याला रिव्हर्स स्विप फटका मारण्याचा प्रयत्न केला. याआधी चेंडू सीमारेषेबाहेर धाडण्यात यशस्वी ठरलेल्या बेन डकेट यावेळी मात्र फसला. चेंडू बॅटची कड घेऊन ध्रुव जुरेलच्या हाती गेला अन् त्याच्या खेळीला ब्रेक लागला. विकेट घेतल्यावर अनेकदा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजासमोर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करताना पाहायला मिळते. पण यावेळी मात्र वेगळेच घडले. आकाशदीपनं ज्याची विकेट घेतली त्या बेन डकेटच्या खांद्यावर हात टाकला अन् त्याच्यासोबत काहीतरी संवाद साधताना दिसला. दोघांच्यात काय बोलणं झालं ते त्या दोघांनाच माहिती. पण त्याचा हा अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे.
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
आता कसं वाटतंय...
बेन डकेट याने ३८ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकाराच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना उलटा फटका खेळण्याच्या नादात तो फसला. ही विकेट पडण्याआधी आकाशदीप आणि बेन डकेट यांच्यात शाब्दिक खेळ रंगल्याचेही पाहायला मिळाले होते. "तू माझी विकेट घेऊ शकत नाहीस," असं काहीसं तो भारतीय गोलंदाजाला म्हणाला होता. त्यामुळेच विकेट मिळाल्यावर आकाशदीपनं "आता कसं वाटतंय.." अशा काहीशा धाटणीत त्याला निरोप दिल्याचे पाहायला मिळाले.