IND vs ENG 5th Test Day 1 Stumps : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी करुण नायरनं संयमी खेळीसह आपल्या फलंदाजीतील खास नजराणा पेश केला. त्याने नऊ वर्षांनी झळकावलेल्या नाबाद अर्धशतकासह वॉशिंग्टन सुंदरसोबत केलेल्या उपयुक्त अन् आश्वासक भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर ६ विकेट्सच्या मोबदल्यात २०४ धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी ६४ षटकांचा खेळ झाला. हा दिवस दोन्ही संघासाठी समसमान असाच राहिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही सलामीवीर स्वस्तात फिरले माघारी
सामना जिंकून मालिका वाचवण्यासाठी ओव्हलच्या मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने अखेरच्या सामन्यातही टॉस गमावला. इंग्लंडचा नवा कर्णधार ओली पोप याने नाणेफेकीचा कौल जिंकून फायदा उचलण्याच्या इराद्याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. चौथ्या षटकात गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. धावफलकावर १० धावा असताना यशस्वी जैस्वालच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. यशस्वी २ चेंडूत ९ धावा करून तंबूत परतला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलनं चुकीचा फटका खेळत क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. त्याने ४० चेंड़ूचा सामना करत १४ धावा केल्या. ३८ धावांवर टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते.
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
साईसोबत जोडी जमली असताना शुबमन गिलनं फेकली विकेट
सलामीवर स्वस्तात माघारी फिरल्यावर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी संघाचा डाव सावरला. पावसाच्या व्यत्ययामुळे 'अंदर बाहर'च्या खेळात या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. सेट झालेल्या शुबमन गिलनं हातातल्या चेंडूवर धाव घेण्यासाठी घाई केली अन् तो ३५ चेंडूत २१ धावा करून धावबाद होऊन परतला. एका बाजूला पावसाचा खेळ अन् दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा खेळखंडोबा असे चित्र या विकेटनंतर निर्माण झाले.
साईनं संयम दाखवला, पण...
शुबमन गिलनं मोठी चूक करत विकेट गमावल्यावर साई सुदर्शनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण १०८ चेंडूचा सामना केल्यावर त्यानेही ३८ धावा करून तंबूचा रस्ता धरला. रवींद्र जडेजा ९ धावा करून माघारी फिरल्यावर टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यात ध्रुव जुरेलच्या विकेटची भर पडली. १५३ धावांवर ६ विकेट्स पडल्यावर गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघ २०० धावांच्या आत आटोपतोय की, काय? अशी भीती निर्माण झाली होती.
करुण नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् मोठं संकट टळलं
संघ अडचणीत असताना करुण नायरनं ५२ (९८) याने संयमी खेळीसह आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देत अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन १९ (४५) याने त्याला सुंदर साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी करत पहिल्या दिवशीच दोनशे धावांच्या आत ऑल आउटचा धोका टाळला. आता दुसऱ्या दिवशी ही जोडी ही भागीदारी आणखी मोठी करुन संघाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी प्रयत्नशील असतील. ओव्हलच्या मैदानात भारतीय संघाने पहिल्या डावात २५० धावांपर्यंत जरी मजल मारली तरी ती उत्तम कामगिरी ठरले. जर ३०० पारचा आकडा पार केला तर भारतीय संघाला सामन्यावर मजबूत पकड मिळवणं सहज सोपे होईल.
Web Title: IND vs ENG 5th Test Day 1 Stumps India 204 For 6 Wicket At Stumps Karun Nair Hits Fifty And Stamd With Washington Sundar In Crease At Kennington Oval London
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.