Join us

IND vs ENG : रेकॉर्ड ब्रेक मॅच! पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्येसह टीम इंडियानं सेट केले अनेक विक्रम

एक नजर टाकुयात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियानं सेट केलेल्या खास विक्रमांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 21:02 IST

Open in App

मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात इंग्लंडच्या संघानं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मानं आपल्या धमाकेदार खेळीसह जोस बटलरचा हा निर्णय फोल ठरवला. अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघानं या सामन्यात ९ बाद २४७ धावा करत अनेक विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. यात अभिषेक शर्माच्या वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमासह टीम इंडियाच्या पॉवर प्लेच्या रेकॉर्डचा समावेश आहे. एक नजर टाकुयात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियानं सेट केलेल्या खास विक्रमांवर

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या 

भारतीय संघानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये १ विकेट्सच्या बदल्यात ९५ धावा ठोकल्या. टीम इंडियाची टी-२० मधील पॉवर प्लेमधील ही सर्वोच्च कामगिरी आहे. याआधी २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने १ बाद ८२ धावा केल्याचा रेकॉर्ड होता. एकंदरीत विचार केला तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाच्या यादीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. या यादीत ११३ धावांसह ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात ११३ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.  

टी-२० क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या 

अभिषेक शर्माच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतीय संघानं इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात निर्धारित २० षटकात ९ बाद २४७ धावा उभारल्या. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील भारतीय संघाची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावंसख्या आहे. २०२४ मध्ये भारतीय संघानं हैदराबादच्या मैदानात ६ बाद २९७  धावा अशी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. याशिवाय  २०१७ मध्ये भारतीय संघानं श्रीलंकेविरुद्ध इंदूरच्या मैदानात ५ बाद २६० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

 अभिषेक शर्मानं एकट्यानं सेट केले अनेक रेकॉर्ड

भारतीय संघानं सेट केलेल्या विक्रमामागे अभिषेक शर्माची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. त्यानेही या सामन्यात अनेक विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून टी-२० तील दुसरे सर्वात जलद अर्धशत आणि शतक झळकावण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये का डावात सर्वाधिक १३ षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला. याआधी १० सिक्सरसह रोहित शर्मा या यादीत टॉपला होता. अभिषेक शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात १३५ धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून या छोट्या फॉर्मेटमधील ही सर्वात मोठी खेळी ठरलीय. याआधी हा रेकॉर्ड शुबमन गिलच्या नावे होता. त्याने १२६ धावांची खेळी साकारली होती. आता भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड अभिषेक शर्माच्या नावे झाला आहे. 

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंड