Join us

IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं

याआधी ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात सलामीवीराच्या रुपात टीम इंडियाकडून गावसकरांच्या भात्यातून पाहायला मिळाली होती मोठी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:59 IST

Open in App

IND vs ENG 4th Test Yashasvi Jaiswal Slams Fifty : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने आपल्या खेळीच्या विपरित संयमी खेळी करत कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक झळकावले. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याच्या भात्यातून आलेली ही तिसरी फिफ्टी प्लस खेळी ठरली. याआधी लीड्सच्या मैदानात त्याने १०१ धावांच्या खेळीसह दुसऱ्या कसोटी सामन्यात ८७ धावांची खेळी केली होती. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानातील त्याची अर्धशतकी खेळी एकदम खास ठरली. कारण ५० वर्षांनी या मैदानात भारतीय सलामीवीरानं ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

याआधी गावसकरांच्या भात्यातून पाहायला मिळाली होती मोठी खेळी

याआधी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी १९७४ च्या दौऱ्यावर भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात १०१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता २०२५ च्या दौऱ्यावर यशस्वी जैस्वालनं अर्धशतकाला गवसणी घातलीये. यशस्वी जैस्वाल ही खेळी आणखी मोठी करेल, असे वाटत असताना ८ वर्षांनी कमबॅकची संधी मिळालेल्या लियाम डॉसन (Liam Dawson) याने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. जैस्वालनं १०७ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. 

KL राहुलनं दाखवला क्लास! १००० धावांसह तेंडुलकर-द्रविडसह गावसकरांच्या क्लबमध्ये एन्ट्री

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात सर्वोच्च कामगिरी करणारे भारतीय सलामीवीर

  • सय्यद मुश्ताक अली ११२ धावा (१९३६)
  • विजय मर्चंट ११४ धावा (१९३६)
  • सुनील गावसकर १०१ धावा (१९७४) 

इंग्लंडविरुद्ध पार केला १००० धावांचा टप्पा, तेही फक्त....

यशस्वी जैस्वालनं  इंग्लंडविरुद्ध १००० धावांचा टप्पाही पार केला आहे. सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. युवा सलामीवीरानं ७ सामन्यातील १६ डावात ७१ च्या सरासरीसह या धावा केल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानेही १६ डावातच इंग्लंडविरुद्ध कसोटीत हजार धावा केल्या होत्या. यादीत राहुल द्रविड अव्वलस्थानी आहे. द्रविडनं इंग्लंडविरुद्ध १५ डावात कसोटीत हजारीचा टप्पा गाठला होता.   

लॉर्ड्सच्या मैदानातील अपशानंतर जबरदस्त कमबॅक, KL राहुलसोबत दमदार भागीदारी

लॉर्ड्सच्या मैदानातील पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल १३ धावांवर बाद झाला होता. दुसऱ्या डावात तर त्याला खातेही उघडता आले नव्हती. दोन्ही वेळी तो जोफ्रा आर्चरच्या जाळ्यात फसला होता. या अपयशानंतर चौथ्या आणि महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यात यशस्वीनं लोकेश राहुलच्या साथीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी त्याने ९४ धावांची भागीदारी रचली. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वाललोकेश राहुलसुनील गावसकर