Ben Stokes Ravindra Jadeja Handshake controversy, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्याच्या पाचव्या दिवशी रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार शतके ठोकत इंग्लंडला विजयापासून रोखले. जाडेजा १०७ आणि सुंदर १०१ धावांवर नाबाद राहिले. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी नाबाद २०३ धावांची भागीदारी केली. पण शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. सामना संपायच्या आधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारतीय अष्टपैलू जाडेजा यांच्यात हात मिळवण्यावरून गोंधळ सुरू झाला होता. या वादामुळे सामना संपल्यानंतर तरी दोघांनी 'शेक हँड' केले की नाही, यावर चर्चा रंगली. जाणून घेऊया, नेमके नंतर काय घडले.
सामन्यात वाद काय झाला?
भारताचा स्कोअर ४ बाद ३८६ धावांवर होता. भारताकडे ७५ धावांची आघाडी होती आणि जाडेजा ८९ धावांवर व सुंदर ८० धावांवर खेळत होते. दिवस संपायला काही षटके शिल्लक होती. सामना अनिर्णित राहणार याची खात्री होती, त्यामुळे इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स खेळ थांबवण्याचा प्रस्ताव घेऊन गेला आणि जाडेजाशी हस्तांदोलन करू इच्छित होता. पण जाडेजा आणि सुंदरने हस्तांदोलन करण्यास नकार दिला. कारण तेव्हा दोन्ही फलंदाज शतकाच्या जवळ होते. यावर स्टोक्स संतापला. पण रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी खेळ सुरूच ठेवला आणि आपापली शतके पूर्ण केली.
सामन्यानंतर स्टोक्सने जाडेजाशी 'शेक-हँड' केले की नाही?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात बेन स्टोक्सने रवींद्र जाडेजाशी हस्तांदोलन करणे टाळल्याचे दिसते. मैदानात झालेल्या वादामुळे स्टोक्स असा वागल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
सत्य वेगळंच निघालं...
हस्तांदोलन न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरीही, सत्य वेगळेच होते. सामना संपताच, इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स स्वतःहून पुढे आला आणि भारतीय फलंदाज रवींद्र जाडेजाशी त्याने हस्तांदोलन केले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
तसेच, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) त्यांच्या X अकाउंटवर बेन स्टोक्स आणि रवींद्र जाडेजा हस्तांदोलन करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे.
घडलेल्या वादावर बेन स्टोक्स म्हणाला...
"भारतीय संघाबद्दल मला खूप आदर आहे. जेव्हा मला खात्री होती की सामना अनिर्णित राहील, तेव्हा मी मुख्य गोलंदाजांना बॉलिंग करण्यापासून रोखले, कारण त्यांना कुठलीही दुखापत होऊ नये हाच हेतु होता. पण सुंदर आणि जाडेजासारख्या खेळाडूंनी शतकी खेळी खेळून आपल्याला संघाला वाचवले, तो प्रयत्न विजयापेक्षा कमी नाही," असे स्टोक्सने स्पष्ट केले.