Rishabh Pant Injury Update : इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटी सामन्यात रिषभ पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आता यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. मँचेस्टरच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यातही लॉर्ड्सप्रमाणेच रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल हा विकेट किपिंगची भूमिका बजावताना दिसणार आहे. एवढेच नाही तर गरज पडल्यास रिषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात उतरेल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ड्रेसिंग रुममध्ये प्रॉपर किटमध्ये स्पॉट झाला पंत
मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिषभ पंतला दुखापत झाली होती. त्याच्या पायाला फॅक्चर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला किमान सहा आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे वृत्तही समोर आले होते. दुसऱ्या दिवशी पंत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रॉपर किटमध्ये स्पॉट झाला. नियमानुसार, दुखापतग्रस्त पंतच्या ऐवजी विकेटमागे ध्रुव जुरेल याला रिप्लेस करता येईल. पण त्याला बॅटिंग करता येणार नाही. आता BCCI नं गरज पडली तर पंत बॅटिंगसाठी मैदानात उतरेल, ही गोष्ट स्पष्ट केली आहे.
ही एक रिस्कच, पण ती वेळ येऊ नये हीच इच्छा
इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ आधीच १-२ अशा फरकाने पिछाडीवर आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंड दौऱ्यावर पंत कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. पण दुखापतीनंतर त्याला बॅटिंगसाठी उतरवणे ही एक मोठी रिस्कच असेल. जर संघ अडचणीत सापडला तर टीम इंडियाकडे दुसरा पर्यायही नसेल. अन्य फलंदाजांनी धमक दाखवली तर कदाचित पंतसंदर्भात ही रिस्क घेण्याची वेळ येणार नाही.