Join us

IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित

इंग्लंडच्या बाजूनं झुकला होता सामना, पण शेवटी टीम इंडियाने हा सामना अनिर्णत राखण्यात यश मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 22:19 IST

Open in App

IND vs ENG 4th Test Match drawn : शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली संयमी आणि आश्वासक भागीदारी, त्यानंतर वॉशिंग्ट सुंदर आणि रवींद्र जडेजा जोडीनं केलेल्या कडक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने टीम इंडियाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात आला. पहिल्या डावात भारतीय संघाला ३५८ धावांवर आटोपल्यावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ६६९ धावा करत ३११ धावांची मोठी आघाडी घेत या सामन्यासह मालिका खिशात घालण्यासाठी परफेक्ट सेटप केला होता. पण...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या चौघांनी मिळून पाडले इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे; त्यात तिघांनी साधला शतकी डाव

दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्यावर टीम इंडियावर या सामन्यात चौथ्या दिवशीच धावांनी नव्हे तर डावाने पराभूत होण्याची वेळ येते की, काय? अशी भीती निर्माण झाली होती. पण चौघांच्या दमदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियाने सामना पाचव्या दिवसावर नेला आणि अखेर हा सामना अनिर्णित राखला. आता या  मालिकेचा निकाल हा  पाचव्या कसोटीवर अवलंबून असेल. लोकेश राहुलनं केलेली ९० धावांची आश्वासक खेळी आणि कर्णधार शुबमन गिलच्या शतकानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद शतकी खेळीसह भारताच्या धावफलकावर ४४५ धावा लावल्या.

Shubman Gill Century : शुबमन गिलनं मारला 'शतकी' चौकार! गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी

आधी लोकेश राहुल- शुबमन गिलची कमाल

मँचेस्टर कसोटी सामन्यात शून्यावर दोन विकेट्स गमावल्यावर शुबमन गिल आणि लोकेश राहुल जोडीनं भारतीय संघाचा डाव सावला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी रचली. लोकेश राहुलचं शतक अवघ्या १० धावांनी हुकले. तो २३० चेंडूत ९० धावांवर तंबूत परतला. बेन स्टोक्सनं त्याची विकेट घेतली. जोफ्रा आर्चरनं शुबमन गिलच्या शतकी खेळीला ब्रेक लावला. गिलनं मालिकेतील चौथे शतक झळकावताना २३८ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. 

मग वॉशिंग्टन सुंदर अन् जड्डूच्या भात्यातून आली शतके

भारतीय संघाने २२२ धावांवर शुबमन गिलची विकेट गमावली होती.  मग वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा जोडी जमली. दोघांनी अर्धी शतकी खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर झुकणार नाही हे चित्र निर्माण केले. एवढ्यावरच न थांबता दोघांनी शतकी खेळी साकारली. रवींद्र जडेजानं १८५ चेंडूचा सामना करताना १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १०७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन सुंदरनं कसोटी कारकिर्दीतील पहिल शतक झळकावताना २०६ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०१ धावांची नाबाद खेळी साकारली. दोघांनी द्विशतकी भागीदारीसह इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंड