मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रंगलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. इंग्लंडच्या सलामीवीरांनी तगडी बॅटिंग करताना जबरदस्त रिप्लाय दिला. झॅक क्रॉउली आणि बेन डकेट जोडीनं पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची दमदार भागीदारी करत संघाला भक्कम स्थितीत नेले. ही जोडी परतल्यावर तिसऱ्या दिवसाच्या खेळात जो रुट आणि ओली पोप जोडी जमली. इंग्लंडची मध्यफळीतील या जोडीची खेळी बहरण्यात भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात झालेल्या काही चुका कारणीभूत ठरल्या. दोघांच्यातील ताळमेळ ढासळल्यावर जो रुटची विकेट घेण्याची आयती संधी टीम इंडियाकडे चालून आली होती. पण सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक असलेल्या रवींद्र जडेजाकडून मोठी चूक झाली अन् जो रुटला जीवनदान मिळाले.
दोन्ही फलंदाज स्ट्राइक एन्डला, तरी....
इंग्लंडच्या डावातील ५४ व्या षटकात
मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या जो रुटनं चेंडू मारल्यावर नॉन स्ट्राइक एन्डवरून ओली पोप धाव घेण्यासाठी सुसाट पळत सुटला. दुसऱ्या बाजूला
जो रूट चेंडूकडे पाहतच उभा राहिला होता. बॅकवर्ड पॉइंटवर फिल्डिंग करत असलेल्या जडेजाने चेंडू पकडला. पण इंग्लंडचे दोन्ही फलंदाज स्ट्राइक एन्डला असतानाही तो रन आउटच्या रुपात विकेटचा डाव साधण्यास चुकला.
...अन् जो रुटला रन आउट करण्याची संधी गमावली
रवींद्र जडेजा हा उत्तम क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. रॉकेट थ्रोसह त्याने अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. पण यावेळी जड्डूनं थ्रो मारायला थोडी गडबडच केली. त्यात कहर म्हणजे नॉन स्ट्राइक एन्डला या संधीच सोन करायला दुसरा कोणीही खेळाडू आला नाही. परिणामी जो रुटला जीवनदान मिळाले. ही संधी गमावल्यावर जडेजा निराश झाल्याचे मिळाले.
मग दोघांच्या भात्यातून आली अर्धशतकी खेळी
या जोडीत ताळमेळाचा अभाव दिसला त्यावेळी इंग्लंडच्या संघाच्या धावफलकावर २ बाद २४७ धावा होत्या. जो रूट ५५ चेंडूचा सामना करून २२ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने अर्धशतक पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. जो रुट ६३ (११५) आणि ओली पोप ७० (१२३) जोडीनं लंच ब्रेकपर्यंत संघाच्या धावफलकावर २ बाद ३३२ धावा लावल्या.