England vs India, 3rd Test : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातील खेळात भारतीय संघाने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १९२ धावांत आटोपला आहे. पहिल्या डावात दोन्ही संघांनी ३८७ धावांची बरोबरी साधली होती. त्यामुळे टीम इंडियासमोर लॉर्ड्सची कसोटी जिंकण्यासाठी फक्त १९३ धावांचे आव्हान मिळाले आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये जो रुट, जेमी स्मिथ अन् बेन स्टोक्स या महत्त्वपूर्ण विकेट्सचा समावेश होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिराजसह नितीश कुमार रेड्डी अन् आकाशदीपनं आघाडीच्या फलंदाजीला लावला सुरुंग
झॅक क्रॉउली आणि बेन डकेट यांनी बिन बाद २ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या २२ धावा असताना बेन डकेटच्या रुपात मोहम्मद सिराजनं टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तो १२ चेंडूत १२ धावा करून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली पोपलाही सिराजनं अवघ्या ४ धावांवर तंबूत धाडले. झॅक क्राउलीच्या रुपात नितीश रेड्डीनं टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले. इंग्लंडचा हा सलामीवीर २२ धावा करून बाद झाला. आकाश दीपनं लंच आधी हॅरी ब्रूकला माघारी धाडले. इंग्लंडच्या संघाने ८७ धावांवर पहिल्या चा विकेट्स गमावल्या होत्या.
वॉशिंग्टन सुंदरन जो रुटसह चार विकेट्स घेत टीम इंडियाच्या बाजूनं वळवला सामना
आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर जो रुट आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ही जोडी जमली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागादीरी रचली. रुटला ४० धावांवर बोल्ड करत वॉशिंग्टन सुंदरनं टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने जेमी स्मिथ ८(१४), बेन स्टोक्स ३३ (९६) या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. शोएब बशीरच्या रुपात चौथी विकेट्स घेत त्याने इंग्लंडचा डाव १९२ धावांवरच रोखला. जसप्रीत बुमराहनं क्रिस वोक्स १० (३३) आणि ब्रायडन कार्सच्या १(४) च्या रुपात दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.