इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाची रिषभ पंतने जबरदस्त सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. केएल राहुलसोबत भारतीय संघाच्या डाव पुढे नेताना दिवसातील पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरचं त्याने चौकारासह स्वागत केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार, पंतनं असं केलं जोफ्रा आर्चरचं स्वागत
रिषभ पंत हा तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाने आघाडीच्या ३ विकेट्स अगदी स्वस्तात गमावल्यावर रिषभ पंतनं मैदानात तग धरून थांबण्यासाठी सावध पवित्रा घेतला होता. पण तिसऱ्या दिवसाची सुरुवात त्याने अगदी धमाक्यात केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच षटकात त्याने दोन खणखणीत चौकार मारले. या षटकात पहिल्या चेंडूवर पुढे येऊन मारलेला चौकार हा इंग्लंडच्या स्टार गोलंदाजाला आश्चर्यचकित करुन सोडणारा होता.
मग आपल्या स्टाइलमध्ये साजरी केली फिफ्टी
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस रिषभ पंतने ३३ चेंडूचा सामना करून १९ धावा केल्या होत्या. ८६ चेंडूत त्याने कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावले. ४९ धावांवर असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर षटकार मारत रिषभ पंतनं कसोटी कारकिर्दीतील अर्धशक पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी टिकून खेळल्यावर आता गियर बदलून तुटून पडण्याचे संकेतच त्याने दिल्याचे पाहायला मिळाले.
आघाडीचे फलंदाज स्वस्तात परतल्यावर KL राहुलसोबत उपयुक्त भागीदारी
दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाने पहिल्या डावाला सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल, करुण नायर आणि शुबमन गिल हे तिघे स्वस्तात माघारी फिरल्यावर रिषभ पंतनं केएल राहुलला उत्तम साथ देत संघाचा डाव सावरणारी उपयुक्त भागीदारी रचली. फिल्डिंगवेळी जसप्रीत बुमराचा चेंडू बोटाला लागल्यावर तो फलंदाजीला येणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण दुखातप झालेल्या बोटावर उपचार घेऊन अन् चेंडू पुन्हा त्यावर लागणार नाही याची विशेष खबरदारी घेत पंत मैदानात उतरला. एवढेच नाही तर अर्धशतकी खेळीसह KL राहुलसोबत त्याने शतकी भागीदारी रचली आहे.