लॉर्ड्स कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपली खास छाप सोडली. मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या भेदक माऱ्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेऊन तिसऱ्या सामन्यात विकेट लेस राहिलेल्या आकाश दीपनं लंच आधी पहिली विकेट घेत आपले खाते उघडले. फटकेबाजीचा पवित्रा घेतलेल्या हॅरी ब्रूकला त्याने क्लीन बोल्ड केले. याआधीच्या षटकात हॅरी ब्रूकनं आकाश दीपची चांगलीच धुलाई केली होती. पण दुसऱ्या षटकात तो आकाश दीपच्या जाळ्यात फसला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी ब्रूकनं केली आकाशदीपची धुलाई, ३ चेंडूत कुटल्या १४ धावा
इंग्लंडच्या डावातील २० व्या षटकात हॅरी ब्रूकनं आपल्या भात्यातील अतरंगी फटकेबाजीचा नजराणा पेश करताना आकाश दीपच्या षटकातील ३ चेंडूत १४ धावा कुटल्या. या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर स्कूप शॉट खेळत ब्रूकनं दोन चौकार मारले. अखेरच्या चेंडूवर षटकार मारत ब्रूकनं हे षटक संपवले.
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
आडव्या तिडव्या फटकेबाजीला लगाम; आकाशदीपनं असा घेतला बदला
२० व्या षटकात आकाश दीपनं मार खाल्ल्यावरही भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला अन् त्याचा स्पेल कायम ठेवला. एवढेच नाही तर फिल्डिंगमध्ये बदल करत ब्रूकला जाळ्यात अडकवण्याचा प्लॅनही रचला गेला. २२ व्या षटकात ब्रूकच्या स्कूपला लगाम लावण्यासाठी फाइन लेगला एक फिल्डर ठेवण्यात आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ब्रूकनं स्कूपऐवजी स्लॉग स्वीप ट्राय केला. पण आकाश दीपनं अचूक टप्प्यावर चेंडू टाकत त्याला चकवा देत मिडल स्टंप उडवली. सोशल मीडियावर ही विकेट्स घेत आकाशदीपनं आधीच्या षटकातील धुलाईचा हिशोब चुकता करत बदला घेतला, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
लंच आधी इंग्लंडचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत
चौथ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात लंच आधी आकाशदीपनं इंग्लंडच्या संघाला ८७ धावांवर चौथा धक्का दिला. याआधी मोहम्मद सिराजनं सलामीवीर बेन डकेट १२ (१२) आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या ओली पोपला ४ (१७) स्वस्तात माघारी धाडले होते. याशिवाय नितीश कुमार रेड्डीनं सलामीवीर झॅक क्राउलीच्या २२ (४९) रुपात टीम इंडियाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले.