Join us

जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी

प्रमुख फलंदाजांनी बुमराह सिराज ऐवढ एवढं धैर्य दाखवलं असतं तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 21:35 IST

Open in App

IND vs ENG 3rd Test Ravindra Jadeja Fighting Spirit England Won By 22 Runs At  Lord's  :  लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या पदरी पराभवाची नामुष्की ओढावलीये. ज्यांच्याकडून फलंदाजीची अपेक्षा होती त्यांनी स्वस्तात तंबूचा रस्ता धरल्यावर रवींद्र जडेजानं बुमराहच्या साथीनं विजयाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या बुमराहनं त्याला उत्तम साथही दिली.  इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं त्याची विकेट घेत टीम इंडियाला पुन्हा अडचणीत आणले. त्याच्या जागी आलेल्या सिराजनंही जड्डूला चांगली साथ दिली. पण त्याने उत्तमरित्या डिफेन्स केलेला चेंडू स्टंपवर जाऊन लागला अन् इंग्लंडच्या संघानं रंगतदार झालेल्या सामन्यात विजय निश्चित केला. 

जड्डू लढला, पण शेवटी इंग्लंडचा संघ भारी ठरला, यजमानांन मालिकेत घेतली २-१ अशी आघाडी

लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत सलग चौथे अर्धशतक झळकावून टीम इंडियाच्या विजयाची आस पल्लवीत करणारा रवींद्र जडेजा दुसऱ्या बाजूला ६१ धावांवर नाबाद राहिला. प्रमुख फलंदाजांनी बुमराह एवढं धैर्य दाखवलं असतं तर या सामन्याचा निकाल नक्कीच टीम इंडियाच्या बाजूनं लागला असता. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

चौथ्या दिवसाअखेरच टीम इंडियाने ५८ धावांत गमावल्या होत्या ४ विकेट्स

लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने ३८७ धावा केल्यावर भारतीय संघानेही तेवढ्याच धावा करत बरोबरी साधली होती. वॉशिंग्टन सुंदरची उत्तम गोलंदाजी आणि मोहम्मद सिराज, बुमराहसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाचा दुसरा डाव १९२ धावांत आटोपला. १९३ धावांचे अल्प आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. यशस्वी जैयस्वालला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. 

प्रमुख फलंदाजांचा फ्लॉप शोनंतर जड्डू एकटा शेवटपर्यंत टिकला, पण...

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी टीम इंडियाला १३५ धावांची गरज होती. लोकेश राहुल आणि पंतनं पाचव्या दिवसातील खेळाला सुरुवात केली. या जोडीकडून मोठ्या आशा होत्या.  पण पंत दुहेरी आकडा गाठण्याच्या आतच माघारी फिरला.  रवींद्र जडेजाच्या अर्धशतकी खेळीशिवाय अन्य प्रमुख फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. केएल राहुल ३९ (५८), करुण नायर १४ (३३),  आणि नितीश कुमार  रेड्डी १३(५३) वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.  जसप्रीत बुमराहनं जड्डूला उत्तम साथ देताना फक्त ५ धावा केल्या. पण या दरम्यान त्याने ५४ चेंडूचा सामना केला. रवींद्र जडेजा शेवटपर्यंत टिकला. पण शेवटी भारतीय संघ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यात कमी पडला. 

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजा