Rishabh Pant Run Out Ben Stokes Hits Direct Throw : भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी सलामीवीर लोकेश राहुल आणि रिषभ पंत ही जोडी एकदम सेट झाली होती. इंग्लंडचे गोलंदाजांना ही जोडी फोडणं कठीण झाले असताना लंच आधी अखेरच्या षटकात रिषभ पंतनं मोठी चूक केली. एक चोरटी धाव घेण्याच्या त्याचा प्रयत्न फसला. बेन स्टोक्सनं निर्माण झालेल्या या संधीचं सोनं करत डायरेक्ट थ्रो मारला अन् टीम इंडियाची सेट झालेली जोडी फुटली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाला मोठा धक्का, बेन स्टोक्सच्या डायरेक्ट थ्रोसह इंग्लंडला मिळाला दिलासा
भारताच्या डावातील ६६ व्या षटकात शोएब बाशीर गोलंदाजी करत होता. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या पंतनं हलक्या हाताने चेंडू खेळला अन् एका धावेसाठी कॉल केला. केएल राहुलनं त्याला होकार देत क्रिज सोडले. बेन स्टोक्सनं कमालीची चपळाई दाखवत चेंडू पकडल्यावर फिरून चेंडू नॉन स्ट्राइक एन्डच्या दिशेनं डायरेक्ट स्टंपवर मारला अन् टीम इंडियाची सेट झालेली जोडी फुटली.
KL राहुलसह पंतलाही लॉर्ड्सच्या मैदानात शतक झळकावण्याची होती संधी, पण...तिसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात रिषभ पंत आणि केएल राहुल जोडीनं १४१ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले होते. लंच आधी लोकेश राहुल शतकाच्या उंबरठ्यावर होता. दुसऱ्या बाजूला पंतनंही ७४ धावा केल्या होत्या. लॉर्ड्सच्या मैदानात दोघांच्या भात्यातून शतक येईल, असे वाटत असताना लंच ब्रेकसाठी तीन चेंडू बाकी असताना रन आउटच्या रुपात पंतनं आपली विकेट गमावली. त्याने ११२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७४ धावांची खेळी. लंच आधी भारतीय संघानं पंतच्या रुपात २४९ धावांवर आपली चौथी विकेट गमावली.