इंग्लंड-भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. बुमराहचा चेंडू लागल्यामुळे बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मैदान सोडणाऱ्या रिषभ पंतनं बॅटिंग वेळी इंग्लंडच्या गोलंदाजांना वेदना दिल्या. क्रिकेटच्या पंढरीत शतकी डाव साधण्याची त्याच्याकडे मोठी संधी होती. पण त्याने स्वत: चोरटी धाव घेण्याच्या नादात आपली विकेट गमावली. पंतनं तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ११२ चेंडूचा सामना करताना ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतकाची संधी हुकली, पण विक्रमांची 'बरसात' केली
एका चुकीमुळं रिषभ पंतनं शतकी खेळीची संधी गमावली असली तरी अर्धशतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. यात धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासोबतच इंग्लंडच्या मैदानात विकेट किपर बॅटरच्या रुपात (Visiting WK Batter) इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला विकेट किपर बॅटर ठरला पंत इंग्लंड विरुद्धच्या लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील कसोटी सामन्यात रिषभ पंतच्या भात्यातून दोन शतके पाहायला मिळाली होती. पहिल्या डावात त्याने १३४ धावा तर दुसऱ्या डावात ११८ धावांची खेळी केली. बर्मिंगहॅमच्या मैदानातील एजबॅस्टनच्या मैदानातील सामन्यात पहिल्या डावात २५ धावा केल्यावर दुसऱ्या डावात त्याने ६५ धावांचे योगदान दिले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील ७४ धावांसह त्याने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या पाच डावात आपल्या खात्यात ४१६ धावा जमा केल्या आहेत. इंग्लंडच्या मैदानात एका मालिकेत ४०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला परदेशी विकेट किपर बॅटर ठरलाय. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात MS धोनीनं ३४९ धावा केल्या होत्या.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा विकेट किपर बॅटर
- रिषभ पंत (भारत): २० डावात ८ वेळा ५० पेक्षा अधिक धावा
- एमएस धोनी (भारत) : २३ डावात ८ वेळा ५० पेक्षा अधिक धावा
- जॉन वेट (दक्षिण आफ्रिका): २७ डावात ७ वेळा ५० पेक्षा अधिक धावा
- रॉडनी मार्श (ऑस्ट्रेलिया) : ३५ ७ डावात ६ वेळा ५० पेक्षा अधिक धावा
- जॉक कॅमरून (दक्षिण आफ्रिका) : १४ डावात ५ वेळा ५० पेक्षा अधिक धावा
रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७४ धावांच्या खेळीत रिषभ पंतच्या भात्यातून २ षटकार आल्याचे पाहायला मिळाले. या दोन षटकारांच्या मदतीने कसोटीत भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंतनं रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित शर्मानं ६७ सामन्यात ८८ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. रिषभ पंतनं ४६ व्या सामन्यात रोहित एवढे षटकार मारले आहेत. या यादीत वीरेंद्र सेहवाग ९० षटकारांसह सर्वात अव्वलस्थानी आहे.