लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुटनं कसोटी कारकिर्दीतील ३७ व्या शतकाला गवसणी घातली. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात त्याच्या भात्यातून आलेले हे ८ वे शतक आहे. या मैदानात सर्वाधिक शतकाचा विक्रम त्याने आणखी भक्कम केला आहे. एवढेच नाही तर या शतकी खेळीसह "फॅब फोर" अर्थात आधुनिक क्रिकेट जगतातील आघाडीच्या चार फलंदाजांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्याने आता आपल्या नावे केला आहे.
फॅब फोरमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा फलंदाज ठरला जो रुट
जो रुट आधी 'फॅब फोर' मध्ये स्टीव्ह स्मिथ ३६ शतकांसह सर्वात आघाडीवर होता. टीम इंडियाविरुद्धच्या ११ व्या शतकासह जो रुटनं कसोटीतील ३७ व्या शतकासह त्याला मागे टाकले. या यादीत केन विल्यमसन ३३ शतकासह तिसऱ्या स्थानावर असून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीच्या नावे ३० शतकांची नोंद आहे.