भारत-इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह विकेटसाठी संघर्ष करताना दिसला. पण दुसऱ्या दिवशी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत जसप्रीत बुमराहनं २ षटकात ३ विकेट्स मिळवत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. या कामगिरीसह भारतीय जलदगती गोलंदाजानं कपिल पाजींचा विक्रमही मोडीत काढला आहे. इंग्लंडच्या मैदानात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता तो दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. आता त्याच्या नजरा नंबर वनचा डाव साधण्यावर असतील. इथं एक नजर टाकुयात त्याने सेट केलेल्या खास विक्रमावर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहनं मोडला कपिल पाजींचा विक्रम
इंग्लंडच्या मैदानात कपिल देव यांनी १३ कसोटी सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. यात १२५ धावांत ५ विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं बेन स्टोक्सची विकेट घेताच कपिल पाजींचा हा विक्रम मागे टाकला. दुसऱ्या दिवशी दोन षटकातील ३ विकेट्स घेत बुमराहनं इंग्लंडच्या मैदानातील कसोटी सामन्यात ४६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक विकेट्सचा घेण्याच्या जवळ
इंग्लंडच्या मैदानात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इशांत शर्मा सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी जसप्रीत बुमराहला आणखी ६ विकेट्सची आवश्यकता आहे. लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्या डावातील दमदार कामगिरीनंतर दुसऱ्या डावातही त्याला हा डाव साधण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराह याने इंग्लंडच्या मैदानात फक्त ९ सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या होत्या. १० व्या सामन्यातच अर्धशतकी टप्पा पार करत तो टॉपर होऊ शकतो. जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात नंबर वन बॅटर हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केले होते. इंग्लंड कॅप्टनचाही त्याने त्रिफळा उडवला. एवढेच नाही तर शतकवीर जो रुटलाही त्याने अचून टप्प्यावर त्रिफळाचित केल्याचे पाहायला मिळाले.
इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
- इशांत शर्मा - ५१ विकेट्स
- जसप्रीत बुमराह - ४६ विकेट्स
- कपिल देव - ४३ विकेट्स
- मोहम्मद शमी- ४२ विकेट्स
- अनिल कुंबळ- ३६ विकेट्स
Web Title: IND vs ENG 3rd Test Day 2 Jasprit Bumrah Broke Kapil Dev Record Elite Indian Bowlers List With Most Wicket In England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.