England vs India, 3rd Test : जसप्रीत बुमराहनं भेदक माऱ्यासह लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला. दुसऱ्या बाजूला जो रुटच्या शतकी खेळीनंतर टीम इंडियाला दमवणाऱ्या जेमी स्मिथ अन् ब्रायडन कार्सला तंबूचा रस्ता दाखवत सिराजनं इंग्लंडचा पहिल्या डावातील खेळ खल्लास केला. क्रिकेटच्या पंढरीत नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने ३८७ धावा केल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडकडून जो रुट तर टीम इंडियाकडून बुमराहनं केली हवा
इंग्लंडकडून जो रुटच्या शतकी खिळीनंतर जेमी स्मिथ आणि तळाच्या फलंदाजीत ब्रायडन कार्सनं उपयुक्त अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी २-२ तर रवींद्र जडेजाने एक विकेट मिळवली.
बुमराहनं लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्यांदाच मारला 'पंजा'
जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीनं ४ बाद २५१ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. जो रुटनं जसप्रीत बुमराह घेऊन आलेल्या दुसऱ्या दिवसातील पहिल्याच षटकात चौकार मारत शतक साजरे केले. पण बुमराहनं कर्णधार बेन स्टोक्सला ४४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. या दोघांनी पाचव्या विकेसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. पुढच्या षटकात बुमराहनं शतकवीर जो रुटसह त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या क्रिस वोक्सला तंबूचा रस्ता दाखवत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. जोफ्रा आर्चरच्या रुपात बुमराहनं लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्यांदाच पाच विकेट्सचा डाव साधला.
अर्धशतकी खेळी करून दमवणाऱ्या दोघांना सिराजनं केलं 'अरेस्ट'
बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या संघाने २७१ धावांवर आपली सातवी विकेट्स गमावली होती. पण त्यानंतर जेमी स्मिथ अन् ब्रायडन कार्स या जोडीनं टीम इंडियाला दमवलं. दोघांनी आठव्या विकेटसाठी ८४ धावांची खेळी केली. मोहम्मद सिराजनं जेमी स्मिथच्या रुपात इंग्लंडला आठवा धक्का दिला. तो ५१ धावांवर बाद झाला. बुमराहनं जोफ्राच्या रुपात पाच विकट्सचा डाव साधल्यावर मोहम्मद सिराजनं ब्रायडन कार्सला ५६ धावांवर बोल्ड करत इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला.