IND vs ENG 3rd Test Back-to-Back Wickets For Jasprit Bumrah : इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. सेट झालेल्या बेन स्टोक्सला अप्रतिम इनस्विंगवर बाद केल्यावर जसप्रीत बुमराहनं एकाच षटकात बॅक टू बॅक २ विकेट्स घेतल्या. शतकवीर जो रुट पाठोपाठ त्याने क्रिस वोक्सला खातेही न उघडता तंबूत धाडले. इंग्लंडच्या संघाला धक्क्यावर धक्के देत जसप्रीत बुमरानं इंग्लंडची अवस्था ७ बाद २७१ अशी केली. जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीन ४ बाद २५१ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. बुमराहच्या गोलंदाजीसमोर २० धावांत यजमान संघाने ३ विकेट्स गमावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अप्रतिम इनस्विंगवर बेन स्टोक्सचा उडवला त्रिफळा
पहिल्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहला पहिली विकेट घेण्यासाठी १६ व्या षटकांपर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती. पण दुसऱ्या दिवशी मात्र बुमराहने लयीत यायला फार वेळ घेतला नाही. जो रुटनं दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार मारत कसोटी कारकिर्दीतील ३७ वे शतक साजरे केले. दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं अप्रतिम इनस्विंग चेंडूवर इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवला.
हॅटट्रिकवर पोहचला, पण... डबल विकेट मेडनसह संपवली ओव्हर, ११ व्या वेळी बुमराहच्या जाळ्यात फसला जो रुट
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ८८ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहनं शतकवीर जो रुटला बोल्ड केले. ११ व्या वेळी बुमराहनं इंग्लंडच्या स्टार बॅटरला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने १९९ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या क्रिस वोक्सला बुमराहनं खातेही उघडू दिले नाही. या विकेटसह बुमराह हॅटट्रिकवर पोहचला होता. पण शेवटी त्याला २ विकेट मेडन ओव्हरवरच समाधान मानावे लागले. हॅटट्रिकचा डाव साधता आला नसला तरी बॅक टू बॅक २ षटकात ३ विकेट्स घेत जसप्रीत बुमराहनं लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्यात ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले.