IND vs ENG 3rd Test KL Rahul Record With Century : इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानात लोकेश राहुलनं आश्वासक खेळी करताना विक्रमी शतक साजरे केले आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात त्याच्या भात्यातून आलेले हे सलग दुसरे अन् विक्रमी शतक ठरले. इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदानात एका पेक्षा अधिक शतक झळकवणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात KL राहुलनं १७७ चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने इंग्लंडच्या मैदानातील चौथे अन् कसोटी कारकिर्दीतील १० शतक साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ना विराट ना सचिन ना रोहित! इथं फक्त एकाच भारतीय फलंदाजाने साधलाय ३ शतके झळकवण्याचा डाव
इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानात सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय स्टार खेळाडूंपैकी एकालाही कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. फक्त दिलीप वेंगसरकर हे एकमेव असे फलंदाज आहेत ज्यांनी इथं ३ शतकी खेळी करण्याचा पराक्रम करून दाखवलाय. त्यापाठोपाठ आता लोकेश राहुल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई सलामीवीर
२०२१ मध्ये लोकेश राहुलनं इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत १३८ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या शतकासह २००० नंतर इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदानात सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक शतके झळकवणारा लोकेश राहुल हा एकंदरीत दुसरा आणि आशियाई देशांतील पहिला सलामीवीरही ठरलाय. ग्रॅमी स्मिथनं या मैदानात सलामीवीराच्या रुपात ५ शतके ठोकल्याचा विक्रम आहे.
लॉर्ड्सच्या मैदानात शतकी डाव साधणारे भारतीय फलंदाज ; इथं पाहा खास रेकॉर्ड
शतकी डाव साधला अन् KL राहुल फसला
लॉर्ड्सच्या मैदानात कर्णधार शुबमन गिलसह यशस्वी जैस्वाल आणि करुण नायर हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परल्यावर लोकेश राहुलनं रिषभ पंतच्या साथीनं संघाच्या डावाला आकार दिला. लंचआधी त्याने पंतच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी रचली. लंच ब्रेकनंतर शतक साजरे केल्यावर लोकेश राहुल अन्य फलंदाजांसोबत मैदानात तग धरून थांबेल, अशी वाटत होती. इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजासमोर तो अगदी आरामात खेळताना दिसला. पण शोएब बशीरच्या गोलंदाजीवर तो फसला. शंभरीवरच तो हॅरी ब्रूकच्या हाती झेल देऊन बाद झाला.