India vs England 3rd T20I Live Updates : मालिका खिशात घातल्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात चार बदलांसह मैदानावर उतरला. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल व हार्दिक पांड्या या चांगल्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना कर्णधार रोहित शर्माने विश्रांती दिली. उम्रान मलिक, रवी बिश्नोई व आवेश खान या तुलनेने अनुभव कमी असलेल्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी परीक्षा घेतली. जोस बटलर व जेसन रॉय पुन्हा अपयशी ठरले असले तरी डेवीड मलान ( Dawid Malan) व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी दमदार खेळ केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने तगडे आव्हान उभे केले. या मालिकेतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. पहिल्या सामन्यात भारताने १९८ धावा चोपल्या होत्या.
प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारताचा कस लागेल हे निश्चित होते, परंतु आवेश खानने चौथ्या षटकात पहिला धक्का दिला. जोस बटलर ( १८) याचा त्रिफळा उडवला. या मालिकात बटलरची बॅट भारतीय गोलंदाजांसमोर थंड राहिली. जेसन रॉय व डेवीड मलान उत्तुंग फटके मारताना दिसले आणि त्यांनी डाव सावरला होता. पण, उम्रान मलिक ८वे षटक टाकायला आला अन् दुसऱ्याच षटकात त्याने जेसन रॉयला ( २७) माघारी पाठवून भारताला दुसरे यश मिळवून दिले. उम्रानचा पहिलाच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारून वाहवाह मिळवणाऱ्या फिल सॉल्टचा ( ८) हर्षल पटेलने त्रिफळा उडवला.
डेवीड मलानने १२व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर १३ धावा चोपताना इंग्लंडचा १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मलानने २९ चेंडूंत ट्वेंटी-२०तील १२वे अर्धशतक पूर्ण केले. मलान व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. लिव्हिंगस्टोनने १६व्या षटकात हर्षल पटेलला मारलेले सलग दोन षटकार पाहण्यासारखे होते. दुसऱ्या षटकाराने तर चेंडू हरवला. मलान व लिव्हिंगस्टोनची ४३ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी रवी बिश्नोईने तोडली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मलानने टोलावलेला चेंडू जागच्या जागी उत्तुंग उडाला अन् रिषभ पंतने सहज टिपला. मलानने ३९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. मोईन अलीही ( ०) बिश्नोईच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
हॅरी ब्रुकनेही येताच दोन खणखणीत चौकार खेचले. विराटने ३६ धावांवर लिव्हिंग्स्टोनला जीवदान दिले. ब्रुक ९ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १९ धावा करून माघारी परतला. लिव्हिंगस्टोन २९ चेंडूंत ४ षटकांरांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ७ बाद २१५ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनने ३ चेंडूंत ११ धावा केल्या. भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील इंग्लंडची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २००७मध्ये त्यांनी ६ बाद २०० धावा केल्या होत्या.