भारतीय संघाला राजकोटच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या संघानं दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १४५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. टीम इंडियाकडू हार्दिक पांड्या हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. पण तरीही मॅच गमावल्यावर तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. काहीजण त्याच्यात मॅच फिनिश करण्याची धमकच नाही, असा दावा करत आहेत. याशिवायही एक कारण आहे ज्यामुळे हार्दिक पांड्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील स्टोरी
कधी अन् नेमकं काय घडलं? पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला पांड्या
हार्दिक पांड्याची विकेट पडली त्यावेळी भारतीय संघाला १२ चेंडूत ४१ धावांची गरज होती. पण तो मॅचमध्ये एक ट्विस्ट आणू शकत होता. त्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याने जे केलं ते नेटकऱ्यांनी चांगलच खुपलं. त्यात पांड्या आउट झाल्यामुळे तो पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला. हा सर्व प्रकार भारताच्या डावातील १८ व्या षटकात घडला. जोफ्रा आर्चरनं अक्षर पटेलची विकेट घेतल्यावर ध्रुव जुरेल मैदानात आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिकच्या भात्यातून एक उत्तुंग षटकार आल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या चेंडूवर एक धाव काढून त्याने स्ट्राइक ध्रुव जुरेलला दिले. जोफ्राच्या अखेरच्या चेंडूवर ध्रुव जुरेल याने डिप स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका मारला. यावेळी पांड्याने सिंगल घेण्यास नकार दिला.
हार्दिक पांड्यानं असं वागण्याची ही काही पहिली वेळ नाही
सिंगल न घेता इथूनं मॅच फिनिश करण्याची ताकद फक्त आपल्यातच आहे, असा काहीसा सीन पांड्याच्या या कृतीमुळे क्रिएट झाला. पण १९ व्या षटकात जेमी ओव्हरटनच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळताना पांड्या इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. पांड्याकडे फटकेबाजीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आधी सिंगलला नकार अन् पुढच्याच चेंडूवर विकेट फेकल्यामुळे चाहते त्याला ट्रोल करू लागले आहेत. गोलंदाजाला बॅटिंगसाठी स्ट्राइक न देणं हे समजू शकते. पण एका बॅटरच्या रुपात संघात असणाऱ्या खेळाडूसोबत अशी कृती करणं न पटण्याजोगेच आहे.
याआधी अशाच प्रकारामुळे हार्दिक पांड्या ट्रोल झाला होता. आता पुन्हा एकदा तसाच सीन पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अर्शदीप सिंग फटकेबाजीच्या मूडमध्ये असताना पांड्याने त्याला नॉन स्ट्राइकला एन्जॉय कर..असा तोरा दाखवून स्ट्राइक आपल्याकडे ठेवले होते. यावेळीही तो ट्रोल झाला होता.