India vs England 3rd ODI Live Update : भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा रोहित शर्माचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य ठरवला. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) सुरुवातीला दोन धक्के दिल्यानंतर कर्णधार जोस बटलरने सहकाऱ्यांसोबत इंग्लंडचा डाव सावरला होता. पण, हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) चतुराईने भारताला मोठे यश मिळवून दिले. हार्दिकने एकाच षटकात बटलर व लिएम लिव्हिंगस्टोन या सेट फलंदाजांना माघारी पाठवून सामनाच फिरवला. या दोघांचेही अप्रतिम झेल रवींद्र जडेजाने टिपले.
रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् गोलंदाजांनी त्याचा विश्वास सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) अनुपस्थिती संधी मिळालेल्या मोहम्मह सिराजने ( Mohammed Siraj) जॉनी बेअरस्टो( ०) व जो रूट (०) यांना चार चेंडूंत माघारी पाठवले. जेसन रॉय व बेन स्टोक्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. जेसन रॉय ३१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ४१ धावांवर बाद झाला. वेगवान बाऊन्सरवर पुढे येऊन फटका मारण्याचा बेन स्टोक्सचा प्रयत्न फसला अन् हार्दिकने स्वतःच्याच गोलंदाजीवर सुरेख झेल टिपला. स्टोक्स २७ धावांवर माघारी परतला.
लिएम लिव्हिंगस्टोन व हार्दिक पांड्या यांच्यातली ठसन पाहताना चाहत्यांना आनंद होत होता. हार्दिक इंग्लंडच्या फलंदाजाला शॉर्ट बॉल टाकून हैराण करताना दिसला, परंतु लिव्हिंगस्टोननेही त्याला षटकार खेचून उत्तर दिले. पण, हार्दिकने आखलेल्या जाळ्यात लिव्हिंगस्टोन अडकला अन् पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर जडेजाच्या हाती झेल देऊन बसला. लिव्हिंगस्टोन २७ धावांवर माघारी परतल्याने बटलरसोबत त्याची ४९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. हार्दिकने त्याच षटकात आणखी एक शॉर्ट बॉलवर बटलरची विकेट घेतली. जडेजाने अफलातून झेल घेतला. बटलरने ८० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६० धावा केल्या.