लंडन : पावसाच्या व्यत्ययामुळे गुरुवारी सामना उशिरा सुरू झाला. त्यानंतर लंच ब्रेकच्या आधीही पाऊस झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा (८३) आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतके झळकावत भारताला शानदार सुरुवात करून दिली आहे. या दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. खेळ चहापानासाठी थांबला तेव्हा भारताने ५२ षटकांत दोन बाद १५७ धावा केल्या होत्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. मात्र सामना अर्धातास उशिराने सुरू झाला. त्यानंतर देखील एका तासासाठी पावसाने खेळात व्यत्यय आणला.
रोहित शर्मा याने १४५ चेंडू ८३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार लगावला. रोहित शतकाच्या दिशेने जात असतांनाच त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. ४६ व्या षटकात अँडरसनच्या चेंडूवर रोहित त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लोकेश राहुल याने शानदार अर्धशतक झळकावले.
खेळ चहापानासाठी थांबला तेव्हा राहूल ५७ धावांवर खेळत होता. त्याच्या सोबतीला कर्णधार विराट कोहली हा देखील खेळपट्टीवर आहे. चेतेश्वर पुजारा याला या सामन्यात देखील मोठी खेळी करता आली नाही. त्याने २३ चेंडूत ९ धावा केल्या. त्यालाही अँडरसनने बाद केले. अँडरसनने त्याला जॉनी बेअरस्टो करवी झेलबाद केले. इंग्लंडकडून दोन्ही बळी जेम्स अँडरसन यानेच घेतले. त्याने १४ षटकांत २४ धावा देत दोन बळी घेतले.