Join us  

"मॅच जिंकायची असेल तर 'या' खेळाडूला टीम इंडियात घ्या"; हरभजन सिंगचे रोखठोक मत

उद्यापासून सुरु होणार इंग्लंड-भारत यांच्यातील दुसरी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 9:42 AM

Open in App

Harbhajan Singh on Team India Playing XI, IND vs ENG: भारतीय संघाचा हैदराबादमध्ये धक्कादायकपणे पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला. सुरूवातीला भारताची मजबूत पकड असलेला सामना अचानक फिरला आणि इंग्लंडने बाजी मारली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विजयी पुनरामगन करण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. पण असे असतानाच भारताच्या अडचणी संपत नाहीएत. विराट कोहली अगोदरच दुसऱ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध आहे. तशातच केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा हे देखील दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. अशा परिस्थितीत उद्यापासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी कोणाला संघात स्थान मिळेल यावर बरीच चर्चा सुरु आहे. याच मुद्द्यावर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने आपले मत व्यक्त केले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने दुसऱ्या कसोटी सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंना संघात समाविष्ट करून घेतले आहे. तसेच रजत पाटीदार देखील संघाचा भाग आहे. अशा वेळी प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळावी यावर हरभजन सिंह म्हणाला, "सर्फराज खानला या सामन्यासाठी संधी मिळायला हवी असं मला वाटतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गेल्या काही काळापासून सातत्याने भरपूर धावा करतोय. इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातही त्याने आपली चमक दाखवून दिली होती. त्यामुळे त्याचा संघात समावेश व्हावा."

"शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी अद्याप फारशा धावा केलेल्या नाहीत. गेल्या १० डावामध्ये त्या दोघांच्याही फलंदाजीला सूर गवसलेला नाही. त्यांच्याकडून संघाला सध्या खूप अपेक्षा आहेत आणि मला आशा आहे की ते त्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील. त्याशिवाय जर खेळपट्टी फिरकीला पोषक असेल तर आपला संघ अधिक आक्रमक पद्धतीने खेळू शकतो. अशा वेळी भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून फक्त जसप्रीत बुमराह दिसेल. बाकीचे स्पिनर्स असू शकतील," असेही हरभजन सिंगने मत व्यक्त केल.

हरभजन सिंगने निवडलेला अंतिम ११ चा संघ- रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव/मोहम्मद सिराज

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडहरभजन सिंगलोकेश राहुलरवींद्र जडेजाभारतीय क्रिकेट संघ