इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात भारतीय संघानं ऐतिहासिक विजय नोंदवला. या मैदानात पहिला कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने इंग्लंडची बादशाहत संपवली. बुमराहच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या बाल्लेकिल्यातील लढाई जिंकण्यासाठी २० विकेट्स कोण घेणार? हा एक मोठा प्रश्नच होता. आकाश दीपनं एकट्यानं १० विकेट्स घेत मोठी समस्या दूर करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय जलदगती गोलंदादाने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आपल्या बहिणीला समर्पित केली. जी कॅन्सरचा सामना करत आहे. सामन्यानंतर खुद्द आकाश दीपनं यासंदर्भातील गोष्ट शेअर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; मॅच विनर गोलंदाजाचा तिला खास मेसेज
कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीनंतर स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या खास मुलाखतीत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आकाश दीप म्हणाला की, माझी बहीण कर्करोगाचा सामना करत आहे. दोन महिन्याआधीच तिला कर्करोग झाल्याचं निदान झालं. ती आता यातून सावरतीये. गोलंदाजी करताना मला तिचा चेहरा दिसायचा. माझी कामगिरी पाहून तिला सर्वाधिक आनंद होईल. मला तिला असंच पाहायचं आहे, असे म्हणत त्याने विक्रमी कामगिरी बहिणीला समर्पित केली. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे म्हणत त्याने बहिणीला खास संदेशही दिल्याचे पाहायला मिळाले.
अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज
आकाश दीप याने बर्मिंगहॅमच्या मैदानातील कसोटी सामन्यात कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्यावर दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना खास विक्रमही रचला. १९७६ नंतर इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील ५ पैकी ४ फलंदाजांना बाद करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.