IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 - भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) बाजी पलटवली. जसप्रीतने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर बेन डकेट याचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. स्टम्पनेही दोन टप्पा घेतल्या आणि त्यानंतर जसप्रीतचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. हैदराबादचं स्टेडियम त्याच्या या आक्रमक सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. भारताच्या पहिल्या डावातील १९० धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने २५ षटकांत ३ बाद १२५ धावा केल्या आहेत.
इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली होती. झॅक क्रॉलीने ३३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या, परंतु आऱ अश्विनने त्याला माघारी पाठवले. बेन डकेट व ऑली पोप यांनी ७च्या सरासरीने धावा चोपल्या होत्या. पण, लंच ब्रेकनंतर चित्र बदलले... जसप्रीत बुमराहने इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने ४७ धावा करणाऱ्या डकेटचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आधीच्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर डकेट पायचीत असूनही जीवदान मिळालं होतं. त्यानंतर जसप्रीतने इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रूटला ( २) पायचीत केले.
जसप्रीतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
जो रूटला ११ वेळा बाद केले आणि मिचेल स्टार्कशी बरोबरी केली. पॅट कमिन्सने सर्वाधिक १४ वेळा रूटची विकेट घेतली आहे. २ धावा करूनही रूटने मोठा विक्रम नावावर केला. भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक २५५७ धावा त्याने नावावर केल्या. त्याने रिकी पाँटिंगचा ( २५५५) विक्रम मोडला.