Join us

Ind vs Eng 1st Test: भारताच्या विजयाची संधी पावसाने हिरावली; पहिला कसोटी सामना अनिर्णित

पाचव्या दिवसाचा खेळ रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 05:59 IST

Open in App

नॉटिंगहॅम : विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे मैदानात उतरताच आले नाही. यामुळे यजमान इंग्लंडविरुद्ध वर्चस्व मिळवल्यानंतरही भारतीय संघाला विजयापासून वंचित रहावे लागले. पावसामुळे अखेरच्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. पहिल्या डावात अर्धशतक, तर दुसºया डावात शतक ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारताच्या विजयाची संधी हुकली आणि यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्याच सामन्यात भारताला मोठा फटका बसला. हा सामना जिंकला असता, तर भारताला १२ गुण मिळाले असते, पण सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी ४ गुण मिळाले. शिवाय आता गुणांसोबत टक्केवारीवरही परिणाम होईल. विजयी १२ गुण मिळाल्यास प्रत्येक संघाला १०० टक्के मिळणार आहेत. पण अनिर्णित सामन्यात संघांना ३३.३३ टक्क्यांवर समाधान मानावे लागणार आहे. इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताला २०९ धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवशी भारताने लोकेश राहुलला गमावत १ बाद ५२ अशी दमदार सुरुवात केली होती. राहुलने खणखणीत ६ चौकार मारत २६ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसअखेर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी टिकून राहत भारताला मजबूत स्थितीत आणले होते. मात्र, पाचव्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. दिवसभर पावसाची खेळी सुरु राहिल्याने, अखेर पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या डावात इंग्लंडला १८३ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने करत ९५ धावांची आघाडी घेतली होती.संक्षिप्त धावफलकइंग्लंड (पहिला डाव) : ६५.४ षटकांत सर्वबाद १८३ धावा.भारत (पहिला डाव) : ८४.५ षटकांत सर्वबाद २७८ धावा.इंग्लंड (दुसरा डाव) : ८५.५ षटकांत सर्वबाद ३०३ धावा.भारत (दुसरा डाव) : १४ षटकांत १ बाद ५२ धावा (लोकेश राहुल २६, रोहित शर्मा नाबाद १२, चेतेश्वर पुजारा नाबाद १२; स्टुअर्ट ब्रॉड १/१८, जेम्स अँडरसन ०/१२, ओली रॉबिन्सन ०/२१.)सामना अनिर्णित.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड
Open in App