India vs England 1st T20 I Live Updates : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. साऊदहॅम्प्टन येथे गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ५० धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि हार्दिक पांड्याने पहिले अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव, दीपक हुडा यांनीही योगदाना देताना भारताला ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारून दिली.
आयपीएल २०२२मध्ये लखनौ सुपर जांयट्सकडून खेळणाऱ्या दीपकला आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिके खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने पहिल्या सामन्यात २९ चेंडूंत ४७ धाव चोपल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ५७ चेंडूंत १०४ धावा झळकावून ट्वेंटी-२०त शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. त्यामुळेच २७ वर्षीय खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त खेळण्याची संधी मिळाली. त्याने १७ चेंडूंत ३३ धावांची खेळी केली. त्याच्या या धावसंख्येत ३ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.
मोईन अलीच्या गोलंदाजीवर दीपकने सलग दोन षटकार खेचले आणि यापैकी एका षटकाराने कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे जखमी होता होता वाचले. शास्त्री या सामन्यात माईक आर्थटनसह समालोचन करत होते. दीपकने मारलेला खणखणीत षटकात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने गेला अन् तो शास्त्री यांना लागणार होता. पण, ते वाचले.
रोहित शर्मा ( २४), दीपक हुडा ( ३३) , सूर्यकुमार यादव ( ३९) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५१ धावा करताना ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक झळकावले. दिनेश कार्तिक ( ११) व अक्षर पटेल ( १७ ) यांनी हातभार लावला. भारताने ८ बाद १९८ धावा केल्या. मोईन अली ( २-२६) व ख्रिस जॉर्डन ( २-२३) यांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का देताना कर्णधार जोस बटलरचा त्रिफळा उडवला. त्यानंतर हार्दिक पांड्याने ७ चेंडूंत तीन विकेट्स घेताना इंग्लंडला हादरवले. युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणाला दोन सेट फलंदाज माघारी पाठवले. इंग्लंडचा संपूर्ण संघ १४८ धावांत माघारी परतला. पदार्पणवीर अर्षदीप सिंग यानेही १८ धावांत २ विकेट्स घेतल्या.