Join us  

IND vs BAN : पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही भारतासाठी खेळायला हे कसे येतात? रोहित शर्मा भडकला, वाचा कोणावर फोडले खापर

India vs Bangladesh : बुधवारी भारताचा दुसऱ्या वन डे सामन्यात पाच धावांनी पराभव झाला, ज्यामुळे बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत २-०  अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 11:05 AM

Open in App

India vs Bangladesh : बांगलादेश दौऱ्यावर भारताला वन डे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. बुधवारी भारताचा दुसऱ्या वन डे सामन्यात पाच धावांनी पराभव झाला, ज्यामुळे बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत २-०  अशी विजयी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियातील खेळाडूंच्या सततच्या दुखापतीवर चिंता व्यक्त केली,  असे का होत आहे याचे कारण जाणून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( NCA) दुखापतीच्या कारणाची चौकशी करेल, अशी आशा रोहितने व्यक्त केली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दोन सामन्यांपर्यंत भारताचे एकूण चार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होते. यामध्ये मोहम्मद शमी (खांदा), रोहित शर्मा (डावा अंगठा), दीपक चहर (हॅमस्ट्रिंग) आणि कुलदीप सेन ( पाठ) यांचा समावेश आहे.

जखमी रोहित शर्मा मैदानावर आला अन् पठ्ठ्याने एका हाताने २८ चेंडूत चोपल्या नाबाद ५१ धावा, पण...  

सामन्यानंतर रोहित म्हणाला, ''दुखापतींशी संबंधित काही चिंता आहेत, आम्हाला त्याचे कारण शोधायला हवे. हे का होत आहे हे मला माहीत नाही. कदाचित ते खूप क्रिकेट खेळत असतील. एखाद्याने त्यांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ते समजून घेणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुम्ही १०० टक्के फिट असायला हवे. पूर्णपणे तंदुरुस्त नसताना तुम्ही भारतासाठी कसे खेळायला येता, हेच समजत नाही.''  

भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी

  • दीपक चहर - हॅमस्ट्रिंग 
  • रोहित शर्मा- डावा अंगठा
  • कुलदीप सेन - पाठ
  • जसप्रीत बुमराह - पाठ
  • रवींद्र जडेजा - गुडघा
  • रिषभ पंत- पाठ
  • प्रसिद्ध कृष्णा - कारण अस्पष्ट
  • मोहम्मद शमी - खांदा

 

काही काळापासून भारतीय खेळाडूंच्या दुखापतींचे प्रमाण वाढले आहे. दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर अशी नावे आहेत जी वेगवेगळ्या दुखापतींशी झुंज देत आहेत. याशिवाय जसप्रीत बुमराहसोबतही असेच घडले. तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याआधीच खेळायला आला, त्यामुळे त्याला पुन्हा दुखापत झाली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून तो बाहेर पडला. भारताचे जवळपास सर्वच मोठे खेळाडू गेल्या वर्षभरात एकदा तरी जखमी झाले आहेत. सहसा दुखापत झाल्यानंतर खेळाडू बेंगळुरू येथील एनसीएमध्ये जातात. ते तेथे ठराविक वेळ घालवतात आणि नंतर ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर निवडीसाठी उपलब्ध होतात.  

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, 'आम्हाला एनसीएमध्ये बसून बोलावे लागेल आणि त्यांचे काम पहावे लागेल. देशासाठी अर्ध्या तंदुरुस्त खेळाडूंना आम्ही खेळायला देऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या कामाचा ताण आम्हाला पाहावा लागेल. देशासाठी खेळणे ही अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची बाब असून ते पूर्णपणे तंदुरुस्त नसतील तर ते ठीक नाही. आपण खोलवर जाऊन त्याचे कारण जाणून घेतले पाहिजे.'

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मा
Open in App