Join us  

IND vs BAN 2nd ODI Live : धाडसी कॅप्टन! संघ अडचणीत असताना जखमी रोहित शर्मा बोटाला पट्टी बांधून मैदानावर उतरला

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 7:23 PM

Open in App

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली. त्याने तातडीने मैदान सोडलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठलं. काही वेळानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये परतला तो डाव्या बोटाला पट्टी बांधून... आता रोहित या सामन्यात काही खेळत नाही असे दिसत असल्याने विराट व शिखर ही जोडी सलामीला आली. पण, संघाची सातवी विकेट पडली अन् रोहितने मैदानावर फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या धाडसाचे साऱ्यांनीच कौतुक केले 

मोहम्मद सिराज, उम्रान मलिक व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची अवस्था दयनीय केली होती. अनामुल हक ( ११), लिटन दास ( ७), नजमूल शांतो ( २१), शाकिब अल हसन ( ८ ), मुश्फीकर रहिम ( १२) व आफिफ होसैन ( ०) हे सहा फलंदाज अवघ्या ६९ धावांवर माघारी परतले. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला स्लीपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मेहिदी हसन मिराज याने पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवली आणि यावेळेस त्याला महमुदुल्लाहच्या अनुभवाची साथ मिळाली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावा जोडल्या. महमुदुल्लाह ९६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर तंबूत परतला. मेहिदी व नसून अहमद यांनी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मेहिदीने  ८३ चेंडूंत  ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद १०० धावा केल्या. बांगलादेशने ७ बाद २७१ धावा केल्या.  

रोहितच्या अनुपस्थितीत विराट कोहली व शिखर धवन ही जोडी सलामीला आली. विराटने चौकाराने खाते उघडले, परंतु इबादत होसैनच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला. विराट ( ५), धवन ( ८) व वॉशिंग्टन सुंदर ( ११) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर पुन्हा एकदा भारताचा डाव सावरतील असे वाटले होते, परंतु पहिल्या सामन्यात ७३ धावांची खेळी करणारा लोकेश आज फेल गेला. मेहिदी हसनने त्याला १४ धावांवर LBW केले.   श्रेयसने वन डेतील १४वे अर्धशतक पूर्ण करताना सर्वात कमी ३४ डावांत वन डेत १५०० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. लोकेश राहुलने ३६ डावांत १५०० धावा केल्या होत्या. यंदाच्या वर्षात भारताकडून वन डे त सर्वाधिक ६८६* धाव श्रेयसने केल्या आहेत. आज त्याने अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी शतकी धावा जोडल्या. श्रेयस- अक्षरची १०७ धावांची भागीदारी मेहिदी हसनने तोडली. १०२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ८२ धाव करणाऱ्या श्रेयसचा आफिफ होसैनने अप्रतिम झेल टिपला. पुढील षटकात अक्षरने खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेशने गोलंदाजीत बदल केला आणि इबादत होसैनने भारताचा सेट फलंदाज अक्षरला (  ५६) बाद केले.

भारताचे ६ फलंदाज १८९ धावांवर माघारी परतले होते आणि विजयासाठी त्यांना ११.४ षटकांत ८३ धावा करायच्या होत्या. मांडीचे स्नायू ताणल्यामुळे ३ षटकं फेकून मैदानाबाहेर गेलेला दीपक चहर फलंदाजीला आला, सोबत शार्दूल ठाकूर होता. शार्दूल ७ धावांवर बाद झाला आणि भारताला विजयासाठी  ४२ चेंडूंत ६४ धावा करायच्या होत्या. अशात रोहित मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बांगलादेशचे चाहते मात्र टेंशनमध्ये आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मा
Open in App