वनडे सामना: ऑस्ट्रेलियामध्ये किंग कोहली, हिटमॅन खेळणार शेवटचा डाव!

भारताला गोलंदाजीची कोडी सोडवावी लागणार, संघात बदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 07:49 IST2025-10-25T07:48:40+5:302025-10-25T07:49:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ind vs australia odi match series 2025 is virat kohli hitman rohit sharma to play last innings in australia | वनडे सामना: ऑस्ट्रेलियामध्ये किंग कोहली, हिटमॅन खेळणार शेवटचा डाव!

वनडे सामना: ऑस्ट्रेलियामध्ये किंग कोहली, हिटमॅन खेळणार शेवटचा डाव!

सिडनी : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-२ असे पिछाडीवर पडल्यानंतर अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा जपण्याच्या निर्धाराने भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी मैदानात उतरेल. परंतु, यावेळी सर्वांच्या नजरा असतील त्या ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि ‘किंग’ विराट कोहली यांच्या फलंदाजीवर. कारण, या स्टार जोडीची ही ऑस्ट्रेलियामधील शेवटची फलंदाजी ठरेल. 

रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत चाहत्यांना दिलासा दिला. परंतु, कोहली दोन्ही सामन्यांत शून्यावर परतल्याने त्याच्याकडून शनिवारी दमदार खेळीची अपेक्षा बाळगली जात आहे. रोहित पहिल्यांदा २००७-०८मध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी येथे आला होता, तर कोहलीचा वरिष्ठ संघासोबतचा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा २०११-१२ सालच्या सत्रात होता. त्यावेळी, कोहलीने ॲडिलेडमध्ये शतक झळकावून प्रभावित केले होते. पुढील दोन वर्षांत ऑस्ट्रेलियामध्ये कोणतीही एकदिवसीय मालिका नसल्यामुळे ही जोडी पुन्हा भारताकडून ऑस्ट्रेलियात खेळेल, याची शक्यता कमीच आहे. 

ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. परंतु, कोहली आणि रोहितच्या उपस्थितीमुळे तिसरा सामना चाहत्यांसाठी अधिक महत्त्वाचा ठरत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील प्रेक्षक निश्चितच या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करतील. त्याचप्रमाणे, गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाला क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हानही पार करायचे आहे. यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 

भारतीय संघाला फलंदाजी मजबूत करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजीत तडजोड करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा लागेल. कुलदीप यादवसारख्या सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूची उपेक्षा करणे आजवर फायदेशीर ठरलेले नाही. 

भारताने फिरकी विभागाची जबाबदारी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर सोपवली, जे चांगले फलंदाजही आहेत. पण, या दोघांना गोलंदाजीत प्रभाव पाडता आला. सध्याचे संघ व्यवस्थापन अष्टपैलूंना प्राधान्य देत असले, तरी नीतीशकुमार रेड्डीला आठव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्याची रणनीती योग्य नाही. 

गोलंदाजीमध्येही तो अपयशी ठरला आहे. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पेलमध्ये वेगात झालेली घट हे स्पष्ट दर्शवते की, तो अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार नाही. 

ऑस्ट्रेलियाची भक्कम स्थिती

ऑस्ट्रेलियन संघाने २०२७मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन आणि कूपर काॅनोली यांसारख्या खेळाडूंनी दबावाच्या परिस्थितीत योग्य रणनीती आखण्याची आणि ती यशस्वीपणे राबविण्याची क्षमता दाखवली आहे. पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या मॅट कुहनेमनला ऑस्ट्रेलिया या सामन्यासाठी अंतिम संघात सामील करण्याची शक्यता आहे.

ग्लेन मॅक्सवेल टी-२० पुनरागमनासाठी सज्ज

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल मनगटाच्या फ्रॅक्चरमधून सावरल्यानंतर भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज महली बिअर्डमॅन याचीदेखील ऑस्ट्रेलिया संघात निवड करण्यात आली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून कॅनबेरा येथे सुरू होईल. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आणि सीन ॲबॉट अनुक्रमे पहिले दोन आणि तीन सामने खेळण्यासाठी उपलब्ध असतील. सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी नेटमध्ये गोलंदाजी करताना मॅक्सवेलच्या मनगटाला दुखापत झाली होती आणि त्यात फ्रॅक्चर आढळले होते.

२० वर्षीय बिअर्डमॅनने आतापर्यंत ‘लिस्ट ए’चे पाच सामने आणि बिग बॅश लीगमधील दोन सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली असून, त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. 

तो २०२४ मध्ये १९ वर्षांखालील विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार खेळाडू होता. गेल्या वर्षी तो ऑस्ट्रेलियाच्या मुख्य एकदिवसीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता.

सामन्याचे स्थळ 

सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी.

सामन्याची वेळ - सकाळी ९:०० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)

थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स नेटवर्क लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ हाॅटस्टार

 

Web Title : कोहली, रोहित का अंतिम ऑस्ट्रेलियाई वनडे? भारत की अंतिम मैच में साख बचाने की कोशिश

Web Summary : भारत का लक्ष्य अंतिम वनडे में ऑस्ट्रेलिया के खिलाफ सम्मान बचाना है। कोहली और रोहित पर ध्यान केंद्रित है, संभवतः ऑस्ट्रेलिया में उनकी अंतिम वनडे उपस्थिति। ऑस्ट्रेलिया ने पहले ही श्रृंखला जीत ली है। भारत क्लीन स्वीप से बचना चाहता है। मैक्सवेल टी20 के लिए लौटे।

Web Title : Kohli, Rohit's Last Australian ODI? India Seeks Redemption in Final Match

Web Summary : India aims to salvage pride against Australia in the final ODI. Focus is on Kohli and Rohit, potentially their last ODI appearance in Australia. Australia already won the series. India seeks to avoid a clean sweep. Maxwell returns for T20s.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.