सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळाडूंमध्ये शेरेबाजीचे प्रकार रंगलेले पाहायला मिळत आहेत. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांच्यात तोडीस तोड शेरेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. पेनच्या 'बेबिसिटिंग' टोमण्याला पंतकडून 'टेम्पररी कर्णधार' असे उत्तर पाहायला मिळाले. त्यांच्या या स्लेजिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही उडी घेतली आहे आणि त्याने गमतीशीरपणे स्लेजिंग करताना पंतचे स्वागत केले.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कुटुंबीयांसह पंतप्रधान मॉरिसन यांची भेट घेतली. या दरम्यान मॉरिसन यांनी प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली. अशाच चर्चेदरम्यान मॉरिसन आणि पंत समोरासमोर आले आणि गमतीदार किस्सा घडला. मॉरिसन म्हणाले,''अच्छा! तुम्हीच स्लेजिंग करता ना? तुमचे स्वागत. आम्हाला स्पर्धात्मक खेळ आवडतो.'' मॉरिसन यांच्या या वाक्यानंतर उपस्थित खेळाडूंना हसू आवरले नाही.
याच कार्यक्रमात पंतने ऑसी कर्णधार पेन याची पत्नी आणि मुलांसोबत फोटो काढले. पंतच्या पत्नीनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना 'पंत हा सर्वोत्तम बेबीसिटर' असल्याची दाद दिली होती. मेलबर्न कसोटीत पेनने यष्टिमागून पंतची स्लेजिंग केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता,''तु कधी मुलांना सांभाळले आहेस का? मला पत्नीसोबत सिनेमा पाहायला जायचा आहे आणि त्याकाळात तु माझ्या मुलांना बघशील का? '' त्यानंतर पेन जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळी पंतनेही त्याता सडेतोड उत्तर देत 'temporary captain' असा टोमणा हाणला होता.