Join us

Ind vs Aus : रोहितबरोबर सलामीला कोण येणार, धवन की राहुल; पाहा प्रशिक्षक काय म्हणाले...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सलामीला नेमकं कोणाला पाठवायचे, हा पेच संघ व्यवस्थापनाला पडलेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 18:07 IST

Open in App

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. त्यामुळे या मालिकेत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना सलामी करण्याची संधी दिली होती. या दोघांनीही दमदार सलामी दिली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सलामीला नेमकं कोणाला पाठवायचे, हा पेच संघ व्यवस्थापनाला पडलेला आहे.

तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. शिखर धवन ( 52) आणि लोकेश राहुल ( 54)  यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. धवन आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलामीला कोण येणार, याबाबत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

"श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये रोहित शर्मा खेळला नव्हता. पण तो चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितला पहिली पसंती देण्यात येईल. पण रोहितबरोबर नेमका कोणता फलंदाज सलामीला येईल," याबाबत सध्या विचार सुरु आहे, असे राठोड यांनी सांगितले.

याबाबत राठोड पुढे म्हणाले की, " श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत धवन आणि राहुल यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता रोहितबरोबर कोणाला खेळवायचे, याबाबत विचार करावा लागेल. संघात चांगलीच स्पर्धा आहे आणि ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे."

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माशिखर धवनलोकेश राहुल