ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ ब्रिस्बेन येथे दाखल झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल होताच भारतीय खेळाडूंनी चाहत्यांशी भेट घेतली. कर्णधार विराट कोहलीने काही चाहत्यांसोबत फोटोही काढले. पण, त्याने पोस्ट केलेला एक फोटो बरचं काही सांगून जाणारा आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोत सोबत असलेल्या सहकारी खेळाडूला 'चॅम्पियन' असे संबोधले आहे. तसेच त्याच्यासोबत जिममध्ये कसून व्यायामही केला.
भारतीय संघ या मालिकेत तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. भारतीय खेळाडू शनिवारी ब्रिस्बेनमध्ये दाखल झाले. कर्णधार कोहलीने यष्टिरक्षक रिषभ पंतसह फोटो काढून ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याचे सांगितले. यावेळी त्याने पंतला 'चॅम्पियन' असे संबोधले.
त्यानंतर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कोहली पंतसह जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. कोहलीच्या या कृतीतून त्याला या मालिकेत पंतकडून जास्त अपेक्षा असल्याचे कळते.