IND vs AUS Test : 'विरुष्का' एकत्र करणार नवीन वर्षाचं स्वागत, अनुष्का पोहोचली सिडनीत
ठळक मुद्देविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकून इतिहास घडवला. 41 वर्षांनतर ऑस्ट्रेलियात मालिकेत दोन कसोटी जिंकण्याचा पराक्रमभारताचा 150 वा कसोटी विजय, अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई देश
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकून इतिहास घडवला. भारताने मेलबर्नवर जवळपास 36 वर्षांनी विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारताने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याचा मान मिळवला. 'विराट'सेनेनं भारतीय चाहत्यांना नववर्षाचं विजयी गिफ्ट दिले आणि त्याचा जल्लोषही त्यांनी दणक्यात केला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा आनंद साजरा करण्याचा वादाचा मुद्दा सोडला, तर भारतीय संघाच्या आनंदासमोर गगनही ठेंगणं वाटत होतं. यात कोहली किती आनंदात असेल हे सांगण्याची गरज नाही. त्याच्या या आनंदात आणखी भर पडली आहे, कारण त्याची पत्नी अनुष्का शर्मा सिडनीत दाखल झाली आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का जोडीनं नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. कोहलीनेही ट्विटरवर नवीन वर्ष आपल्या लाडक्या व्यक्तीसोबत म्हणजेत अनुष्कासोबत साजरे करणार असल्याची पोस्ट टाकली. भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत 137 धावांनी यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमरा ( 9 विकेट) या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगलेच हैराण केले आणि शरणागती पत्करण्यास भाग पाडले. विजयानंतर हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांबरोबर भारतीय खेळाडूंनी नृत्यही केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका विजयाची चव चाखण्यासाठी कोहली व सहकारी उत्सुक आहेत.