ठळक मुद्देमाजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टीकाविराट कोहली व रवी शास्त्री यांच्यासह निवड समितीवर तोफ26 डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात
मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी असूनही भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यातील विजयानंतर उंचावलेला आत्मविश्वास पर्थ कसोटीत डळमळीत झालेला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी विजय मिळवून मालिका 1-1 अशा बरोबरीत आणण्यात यश मिळवले. भारतीय संघाच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
पुढील दोन कसोटी सामन्यांत भारताला विजय मिळवता आला नाही, तर कोहली आणि शास्त्री यांची योग्यतेचे मूल्यांकन करावे लागेल, असे ठाम मत गावसकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,''संघ निवडताना व्यवस्थापन नेहमी चुक करते. हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून सुरुच आहे आणि त्याचा संघाला फटका बसत आहे. पर्थ कसोटीतही योग्य संघ निवड केली असती तर सामना जिंकता आला असता.''
''सलामीची समस्या, गोलंदाजांची निवड याचा विचार करावा लागणार आहे. त्यावर तोडगा काढला तर भारत पुढील दोन्ही सामने जिंकता येतील. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितही भारताला विजय मिळवता येत नसेल, तर त्याचा विचार निवड समितीने नक्की करायला हवा,'' असेही गावसकर यांनी सांगितले.
![]()
भारताचे माजी सलामीवर गावसकर यांनी जम्बो चमूवर टीका केली. ते म्हणाले,'' 19 खेळाडूंची संकल्पना कोणाची आहे, हे मला शोधायचे आहे. असे असेल तर आणखी तीन खेळाडू घेऊन का जात नाहीत? बीसीसीआय श्रीमंत संघटना आहे आणि ते 40 लोकांनाही घेऊन जाऊ शकतात. निवड समिती त्यांची जबाबदारी योग्यरितीने हाताळत नाही.''
''लोकेश राहुलला उर्वरित दोन सामन्यांत खेळवण्याचा काहीच प्रश्न उतर नाही. त्याने मायदेशात यावे आणि कर्नाटककडून रणजी क्रिकेट खेळावे. त्याचा फॉर्म गेलाय म्हणून मी हे बोलत नाही, तर त्याचे चित्तच थाऱ्यावर नाही. त्याने हे चुकीचे सिद्ध केल्यास मलाच सर्वाधिक जास्त आनंद होईल,'' असेही गावसकर यांनी सांगितले.