Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ind vs Aus Test: पंतच्या तुलनेत साहाला प्राधान्य; ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटीत यष्टिरक्षकाचा लागणार कस

३६ वर्षीय साहाच्या रूपाने चांगला यष्टिरक्षक की २३ वर्षीय पंतच्या रूपाने शानदार फलंदाज यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची, याबाबत चर्वितचर्वण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:54 IST

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यात रिद्धिमान साहाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. ऋषभ पंत आक्रमक फलंदाज असला तरी साहाचे यष्टिरक्षणाचे कौशल्य शानदार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ चर्चेचा विषय आहे. ३६ वर्षीय साहाच्या रूपाने चांगला यष्टिरक्षक की २३ वर्षीय पंतच्या रूपाने शानदार फलंदाज यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची, याबाबत चर्वितचर्वण सुरू आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने आपली रणनीती अद्याप स्पष्ट केलेली नाही आणि हनुमा विहारीला याबाबत विचारले असता तो म्हणाला, निकोप प्रतिस्पर्धा संघाच्या हिताची आहे. शानदार यष्टिरक्षण कौशल्य व बचावात्मक फलंदाजी करणाऱ्या साहा याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली, सहायक प्रशिक्षक विक्रम राठोड, भरत अरुण व निवड समिती सदस्य हरविंदर सिंग सामन्याच्या परिस्थितीच्या आधारावर या दोघांचे आकलन करतील. साहा याने पहिल्या सराव सामन्यात ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करीत भारताचा ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने जेम्स पॅटिन्सन, मायकल नेसेर व कॅरमन ग्रीन यांच्यासारख्या गोलंदाजांचा सामना केला. याउलट पंतने दुसऱ्या सराव सामन्यात शतकी खेळी केली. त्यावेळी भारतीय संघ सुस्थितीत होता. त्याला लेग स्पिनर मिशेल स्वेपसन व कामचलाऊ गोलंदाज निक मेडिसनच्या गोलंदाजीला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डरने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या गोलंदाजीची कामगिरी निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. साहा याने ३७ कसोटी सामन्यांत १२३८ धावा केल्या. त्यात तीन शतकांचा समावेश आहे. त्याने ९२ झेल व ११ यष्टिचितचे बळी घेतले आहेत. जर पहिल्या कसोटी सामन्यात साहाला संधी मिळाली तरी पंतची शक्यता संपुष्टात येणार नाही. साहाला संघातील स्थान कायम राखण्यासाठी यष्टीपाठीच नव्हे तर यष्टीपुढेही चांगली कामगिरी करावी लागेल.

टॅग्स :रिषभ पंतवृद्धिमान साहा