IND vs AUS Test DRS Call Controversy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पंचांनी दिलेल्या एका निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. मिचेल मार्शच्या विकेटसाठी भारतीय संघाने अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्ह्यू घेतला होता. पण तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं निर्णय दिला.
नेटकऱ्यांनी दाखवला पुरावा!
या निर्णयानंतर खराब अंपायरिंगसंदर्भातील मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. रिप्लेमध्ये चेंडू आधी पॅडला लागल्याचे स्पष्ट दिसते. पण तिसऱ्या पंचांना ही गोष्ट दिसली नाही. नेटकरी हा पुरावा दाखवून तिसऱ्या पंचावर निशाणा साधत आहेत.
विराट कोहलीनं दिला KL राहुलचा दाखला
विराट कोहलीनं थेट मैदानातील पंचांकडे धाव घेत या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. यावेळी कोहलीनं भारतीय फलंदाज लोकेश राहुलसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा दाखलाही देत मैदानातील पंचांनाच आरसा दाखवल्याचा प्रकार पाहायला मिळाला. केएल राहुलला आउट दिलं होतं मग मिचेल मार्श नॉट आउट कसा? असा प्रश्न किंग कोहलीनं पंचांसमोर उपस्थितीत केला.
नेमकं कधी अन् काय घडलं?
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ५८ व्या षटकात आर अश्विन गोलंदाजी करत होता. तिसऱ्या चेंडूवर अश्विनं मिचेल मार्शला चकवा दिला. चेंडू पॅडवर आदळला आणि भारतीय फिरकीपटू अश्विनसह संघातील गोलंदाजांनी पायचीत विकेटसाठी जोरदार अपील केली. मैदानातील पंचांनी अपील फेटाळल्यावर रोहित शर्मानं रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचे सांगत मैदानातील पंचांचा निर्णय कायम ठेवला.
KL राहुलसंदर्भातील निर्णय ठरला होता वादग्रस्त
पर्थ कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लोकेश राहुलसंदर्भातील निर्णयही वादग्रस्त ठरला होता. मैदानातील पंचांनी नॉट आउटचा निर्णय दिल्यावर DRS नंतर तिसऱ्या पंचांनी हा निर्णय बदलून लोकेश राहुलला बाद दिले होते. ठोस पुरावा नसताना पायचीतचा निर्णय बदलण्यात आला होता. पण मिचेल मार्शच्या बाबतीत जे घडलं ते अगदी उलट आणि टीम इंडियाच्या विरोधात होते.