भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पर्थच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. रविवारी, १९ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात पोहचल्यावर लगेच भारतीय संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली. सराव सत्राच्या वेळी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून आले. कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित आणि गंभीर यांची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-गंभीर यांच्या जवळपास अर्धा तास चर्चा
स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून भारतीय संघाच्या सराव सत्रातील खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा सरावासाठी नेटमध्ये येताना दिसते. एवढेच नाही तर तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत बराच वेळ चर्चा करताना दिसतो. जवळपास अर्धा तास दोघांच्या चर्चा झाली, असा दावाही काही वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
ज्या चर्चा रंगल्या त्या फोल ठरवणारा व्हिडिओ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माचं भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल, असे वाटत होते. पण अचानक मोठा निर्णय झाला आणि त्याच्या जागी कसोटी पाठोपाठ एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली. या निर्णयामागे गौतम गंभीरचा हात असल्याचा दावाही करण्यात आला. ही गोष्ट रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील दरी निर्माण करणारी ठरेल, असेही बोलले गेले. पण या चर्चा या व्हिडिओमुळे फोल ठरतात.
कॅप्टन्सी बदलासंदर्भातील निर्णय घेण्याआधी निवडकर्त्यांनी रोहितसोबत केली होती चर्चा
भारतीय एकदिवसीय संघातील नेतृत्वबदलानंतर बीसीसीआय निवड समितीची अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले होते की, शुबमन गिलकडे नेतृत्व देण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. हा निर्णय घेण्याआधी वैयक्तिकरित्या रोहितसोबत चर्चाही केली होती, सर्व गोष्टी इथं सांगू शकत नाही. पण वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळे कर्णधार नको, हाच यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगतिले होते.