IND vs AUS, Shubman Gill Joins Virat Kohli In Unwanted Record : पर्थच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत मिचेल मार्शच्या नेतृवाखालील ऑस्ट्रेलिया संघाने ७ विकेट्स राखून सामना जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यातून शुबमन गिलनं वनडेतील कॅप्टन्सीच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली. शुभआरंभ एवजी पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडल्यामुळे युवा कर्णधाराच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने किंग कोहलीच्या नकोशा रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेतृत्व करताना पहिल्या सामन्यात पदरी पराभव
शुबमन गिलनं झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. ६ जुलै २०२४ मध्ये लिंबू टिंबू संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली होती. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड दौऱ्यातून शुबमन गिलनं कॅप्टन्सीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्यात वनडे सामन्याची भर पडली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेतील पराभवानंतर शुबमन गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या सामन्यात पराभूत कर्णधार ठरला आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे तर आयपीएलमध्येही कॅप्टन्सीतील पहिल्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
विराट कोहलीच्या बाबतीतही हेच घडलं
IPL सह आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करताना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करण्याची वेळ विराट कोहलीवरही आली होती. गिलप्रमाणेच किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर कोहलीनं कॅप्टन्सीत खास छाप सोडली होती. आंतरारष्ट्रीय क्रिकेटसह कोहलीनं IPL आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करताना पहिला सामना गमावल्याचा रेकॉर्ड आहे.