Rohit Sharma Virat Kohli Australia Tour, IND vs AUS: टीम इंडिया पर्थमध्ये पोहोचली आहे. त्यांचा सध्याचा ऑस्ट्रेलिया दौरा पर्थमधूनच सुरू होणार आहे. भारतीय संघ वनडे आणि टी२० मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. भारत वनडे मालिकेचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाला एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले. ही समस्या विमान उड्डाणाच्या विलंबासंबंधी होती.
विमानाला उशीर, खेळाडू प्रवासातच हैराण
टीम इंडिया ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचे विमान पर्थ येथे चार तास उशिरा पोहोचले. उशिराने झालेल्या उड्डाणाचा परिणाम खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, त्यांचा थकवाही स्पष्ट दिसत होता. भारतीय संघ १६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला.
उशिरा पोहचल्यानंतर काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सकाळी लवकर पर्थमध्ये पोहोचली. विमान पोहचायला उशीर झाला असला तरीही सराव वेळापत्रकात कोणताही बदल झाल्याचे वृत्त नाही. संध्याकाळी एकही दिवस विश्रांती न घेता भारतीय संघ सराव करणार आहे. भारतीय संघाचा सराव ऑस्ट्रेलियन वेळेनुसार संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालेल असे सांगितले जात आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
टीम इंडिया १९ ऑक्टोबरला पहिला एकदिवसीय सामना खेळेल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अडलेडला जातील. तेथून संघ सिडनीला जाईल, जिथे ते २५ ऑक्टोबर रोजी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेला २९ ऑक्टोबरला कॅनबेरा येथून सुरूवात होईल. दुसरा टी२० सामना ३१ ऑक्टोबरला मेलबर्नला खेळला जाणार आहे. तर तिसरा टी२० सामना २ नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे होईल. चौथा टी२० सामना ६ नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट येथे तर ८ नोव्हेंबरला शेवटचा सामना ब्रिस्बेनला खेळला जाईल.