सिडनी : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी खेळाडूंच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आलेला फलंदाज मार्कस हॅरिसने भारताच्या भेदक वेगवान माऱ्याला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे. यंदाच्या स्थानिक मोसमात व्हिक्टोरियातर्फे शानदार कामगिरी करणाऱ्या हॅरिसचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला. कारण विल पुकोवस्की व डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त असल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत.
हॅरिस म्हणाला,‘मी चांगल्या फॉर्मात असल्याचे मला वाटते. माझ्याबाबत अधिक अपेक्षा उंचावलेल्या नाहीत, ही चांगली बाब आहे. मी भारतीय गोलंदाजांना सामोरे जाण्यास सज्ज आहे.’ हॅरिसने शेफिल्ड शील्डमध्ये दोन सामन्यांत ११८.३३ च्या सरासरीने ३५५ धावा केल्या. तो म्हणाला,‘चांगली कामगिरी केली तर निवड होऊ शकते, याची मला कल्पना होती. गेल्या मोसमात मी कसोटी संघाचा सदस्य नव्हतो. मी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. आता मी कसोटी खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’ हॅरिसने ऑस्ट्रेलियातर्फे ९ कसोटी सामने खेळले आहे आणि यापूर्वी ॲशेस जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य होता. ॲशेस २०१९ नंतर त्याचा हा पहिला कसोटी सामना असेल.