अॅडलेड : ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने पंचाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या पद्धतीवर (डीआरएस) प्रश्न उपस्थित करताना ही उत्तम प्रणाली नसून याच्यासोबतचा अनुभव निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लढतीदरम्यान डीआरएसबाबतचे काही निर्णय ऑस्ट्रेलियाच्या विरोधात गेले.
अजिंक्य रहाणे वैयक्तिक १७ धावांवर असताना रविवारी पंच निजेल लाँग यांनी त्याला बाद दिले होते, पण रिप्लेमध्ये चेंडू फलंदाजाच्या पॅडला लागून गेल्याचे स्पष्ट झाले. यामुळे लाँग यांना आपला निर्णय बदलावा लागला होता. त्याचप्रमाणे चेतेश्वर पुजारा याला दुसऱ्या डावात वैयक्तिक ८ व १७ धावांवर बाद देण्यात आले होते, पण या दोन्ही वेळी डीआरएसनंतर पंचाला निर्णय बदलावा लागला. पहिल्या वेळी चेंडू बॅट किंवा ग्लव्हस्ला लागला नसल्याचे स्पष्ट झाले तर दुसºया वेळी चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचे निदर्शनास आले. पेन म्हणाला, ‘डीआरएस उत्तम प्रणाली नाही. हे निराशाजनक आहे. माझ्या मते ही पद्धत सर्वांसाठीच निराशाजनक आहे.’ (वृत्तसंस्था)