ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. पर्थच्या मैदानातून १९ ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. रविवारी रंगणाऱ्या पहिल्या सामन्याआधी पर्थच्या मैदानात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघातील दोन युवा खेळाडूंसह ऑस्ट्रेलियातील दोन स्टार खेळाडूंची खास झलक समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियातील युवा खेळाडूंनी 'जानी दुश्मन'सोबत मारल्या गप्पा; मग काढला फोटो
पर्थच्या मैदानातील जे फोटो समोर आले आहेत त्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टार बॅटर ट्रॅविस हेड आणि प्रमुख जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कनं पर्थच्या मैदानातील वनडे सीरीज लॉन्च कार्यक्रमात हजेरी लावली होती. दुसऱ्या बाजूला भारताकडून युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि ध्रुव जुरेल ही जोडी पर्थच्या मैदानात दिसली. यावेळी ट्रॅविस हेडनं भारतीय युवा खेळाडूंशी गप्पा गोष्टी केल्याचे पाहायला मिळाले. पर्थच्या मैदानात रंगणाऱ्या लढतीआधी ऑस्ट्रेलियन ताफ्यातील टीम इंडियाचा 'जानी दुश्मन' असलेल्या ट्रॅविस हेडसोबत खास गोडवा दाखवणारे भारतीय ताफ्यातील युवा खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
IPL मध्ये एकाच संघाकडून खेळताना दिसले
ट्रॅविस हेड हा आयसीसी स्पर्धेत सातत्याने भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियाचा 'जानी दुश्मन' असं म्हटलं जाते. आगामी वनडे मालिकेतही तो भारतीय संघातील गोलंदाजांना आव्हान देऊ शकतो. हेड वर्सेस जसप्रीत बुमराह यांच्यातील सामना बघण्याजोगा असेल. या लढतीआधी ट्रॅविस हेडनं नितीश कुमार रेड्डीसह ध्रुव जुरेलसोबत गप्पा मारत फोटो सेशनच्या ठिकाणापर्यंत पोहचला. ट्रॅविस हेड आणि नितीश कुमार रेड्डी हे IPL मध्ये काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून एकत्र खेळताना दिसले आहेत. त्यामुळेच दोघांच्यात चांगलं बॉन्डिंग आहे. ती गोष्ट पर्थच्या मैदानात पाहायला मिळाली. पण भारतीय संघानं या इवेंटमध्ये या दोन युवा खेळाडूंना का पाठवलं? ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅविस हेड आणि मिचेल स्टार्क ही जोडीनं हजरी कशी काय लावली? यासंदर्भातील गोष्ट मात्र गुलदस्त्यातच आहे.