- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर
रोहित शर्मा लवकरच भारतीय संघात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. १४ दिवस विलगीकरण अनिवार्य असल्याने पहिल्या दोन कसोटींना तो मुकेल. त्याचा अनुभव आणि कौशल्य पाहता भारतासाठी हा धक्का ठरतो. रोहितच्या मुद्दावर बराच वाद झाला. तथापि आता वाद करण्यात अर्थ नाही. १७ डिसेंबरपासून सुरू होणारी मालिका कशी जिंकायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वन डेत भारताने तिसऱ्या सामन्यात उत्कृष्ट खेळ करीत व्हाईटवॉश टाळला तर टी-२० त ऑस्ट्रेलियाने भारताला क्लीन स्वीपपासून वंचित ठेवले. या दोन्ही मालिकेदरम्यान उभय संघांना महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या सेवेस मुकावे लागले. चुरशीच्या वातावरणामुळे कसोटी मालिका किती उत्कंठापूर्ण होईल,याचे संकेत मिळतात. पण पांढऱ्या चेंडूच्या तुलनेत लाल चेंडूचा खेळ वेगळा असतो, हेच खरे.
२०१८ ला भारताने येथे ७० वर्षांत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली. यामुळे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करता येते, हा मानसिक अडथळा कमी झाला.
यंदा ऑस्ट्रेलिया वचपा काढण्यास सज्ज असेल. त्यावेळी यजमान संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ नव्हते. यावेळी दोघेही आहेत शिवाय २०१९ च्या ॲशेसमध्ये लक्ष वेधणारा मार्नस लाबुशेनही आहेच. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखणे हे भारतासाठी आव्हान नाही, पण वेगवान, उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर आपले फलंदाज स्थिरावू शकतील की नाही हे खरे आव्हान असेल. काढलेल्या धावांचा बचाव करण्याची जबाबदारी गोलंदाजांवर असेल. बुमराह, शमी आणि ईशांत हे मागच्या दौऱ्यात यशस्वी ठरले होते. फलंदाजीत कोहली आणि पुजारा यांनी आघाडी सांभाळली होती. यंदा दोन सामन्यात रोहित दिसणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत यजमान गोलंदाज भारताच्या फलंदाजांविरुद्ध चवताळलेले असतील.
दोन सराव सामन्याद्वारे भारतीय खेळाडूंनी परिस्थितीशी एकरुप होण्याचा चांगला प्रयत्न केला. दुसऱ्या सामन्यात पृथ्वी शाॅ याचा अपवाद वगळता युवा खेळाडूंचाही प्रभाव जाणवला. शुभमान गिल, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिद्धमान साहा, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज असे प्रतिभावान खेळाडू सज्ज असताना कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची डोकेदुखी वाढणार आहे. वेगवेगळ्या स्थानांसाठी अनेक चेहरे आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी समतोल साधताना कुणाकुणाला खेळवायचे हा प्रश्न असेल.