अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सर्वांच्या नजरा असतील त्या भारताचा कर्णधार विराट कोहलीवर. कारण गेल्या दौऱ्यात कोहलीने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. त्याचबरोबर भारताचे पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी कोहलीला या दौऱ्यातच मिळाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कोहलीचा धसका घेतल्याचे ऐकिवात आहे. पण कोहलीला झटपट बाद करण्यासाठी एक माजी गोलंदाज टीप्स देत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
कोहलीने आतापर्यंत 73 कसोटी सामन्यांमध्ये 53.57 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या 73 कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने 24 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात कोहली आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यामध्ये चढाओढ होती. पण आता स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या संघात नाही. त्यामुळे या दौऱ्याच कोहलीच सर्वात जास्त धावा करेल, असे म्हटले जात आहे.
कोहलीचा सामना कसा करायचा, त्याला झटपट बाद कसे करायचे, हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सांगण्यासाठी एका माजी खेळाडूने धाव घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोहलीला बाद करण्यासाठी खास टीप्स देत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता.
अॅडलेड कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना पर्थ येथे 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे मेलबर्न व सिडनी येथे 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. हे सामने अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे जानेवारी महिन्यात होतील. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. सराव सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली असून तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही.