भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी पर्थहून ॲडलेडला रवाना झाला आहे. गुरुवारी २३ ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना ॲडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी बीसीसीआयनं टीम इंडियातील खेळाडूंचा एक खास व्हिडिओ अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. यात खेळाडूंचा कडक लूक आणि विमानतळावरील टीम इंडियातील खेळाडूंबद्दल ऑस्ट्रेलियातील भारतीय चाहत्यांमध्ये असणारी क्रेझ याची खास झलक पाहायला मिळते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियातील खेळाडूंची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही
बीसीसीआयनं जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात भारतीय एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मासह श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांची खास झलक पाहायला मिळते. विमानतळावर विराट कोहलीसहरोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर ही मंडळी चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यासोबतच त्यांना स्वाक्षरी देताना दिसून आले. विमानतळावर भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाचे खास अंदाजात स्वागत करताना संघातील खेळाडूंना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्याचेही पाहायला मिळाले.
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
अर्शदीप सिंगचा मजेशीर अंदाज
या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंगचा खास आणि मजेशीर अंदाज पाहायला मिळतो. टीम बसमध्ये ध्रुव जुरेलसोबत बसलेल्या अर्शदीप सिंगचा मजेशीर अंदाजही लक्षवेधी ठरताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये अर्शदीप टीम इंडियाच्या ताफ्यातील गोलंदाजीतील प्रशिक्षक मोर्ने मॉर्कल यांचीही खास मुलाखत घेताना दिसते.
टीम इंडियासाठी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी महत्त्वाचा असेल हा सामना
भारतीय संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील पर्थच्या मैदानातून वनडेतील नव्या पर्वाची सुरुवात केली. पावसाचा खेळ आणि फलंदाजीत आघाडीच्या फलंदाजांसह गोलंदाजीतील फ्लॉप शोमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यामुळे मालिका गमावण्याची टांगती तलवार टीम इंडियावर आहे. ॲडलेडच्या मैदानातील सामना जिंकून मालिकेत १-१ बरोबरी साधण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. ॲडलेडच्या ओव्हल मैदानात भारतीय संघाने आतापर्यंत १५ एकदिवसीय सामने खेळले असून यात ९ सामन्याती टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर एक सामना हा अनिर्णित राहिला आहे. हा रेकॉर्ड आणखी भक्कम करून टीम इंडिया मालिकेत बरोबरीचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.