IND vs AUS Australia Make Massive Changes For India White Ball Matches : भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह ३ सामन्यांची मालिका खिशात घालणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या ताफ्यात अचानक बदल केले आहेत. भारताविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय सामन्यासह पाच टी-२० सामन्यांसाठी ग्लेन मॅक्सवेलला संघात स्थान देण्यात आलं आहे. अॅशेस कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर काही गोलंदाजांना मात्र विश्रांती देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेनंतर रंगणार टी-२० चा थरार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वनडे आणि टी-२० मालिकेसाठी आधीच संघ जाहीर केला होता, पण आता नव्या बदलांसह ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. भारत–ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना शनिवारी सिडनीत खेळवला जाणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे.
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
मॅक्सवेलची एन्ट्री; दोन गोलंदाजांना केलं रिलीज
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ सामन्यांच्या टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल टी-२० संघात पुनरागमन करण्यास सज्ज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. पहिल्या दोन टी-२० सामन्यानंतर तो ऑस्ट्रेलियन संघाच्या ताफ्यात सामील होईल. जोश हेजलवूड आणि सीन एबॉट यांना अॅशेस कसोटी मालिकेच्या तयारीसाठी संघातून रिलीज करण्यात आले आहे. हेजलवूड पहिल्या दोन टी-२० सामन्यानंतर तर एबॉट तीन टी २० सामन्यानंतर शेफील्ड शील्ड स्पर्धेत खेळताना दिसतील. बेन ड्वॉरशुइस चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध असेल. याशिवाय वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज माहली बीयर्डमन हा तिसऱ्या टी-२० सामन्यापासून संघाला जॉईन होईल. जोश फिलिपे याला टी-२० मालिकेतील सर्व सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
वनडे संघातही बदल
सिडनीतील सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघातही काही फेरबदल करण्यात आले आहेत. पर्थ वनडेत खेळलेला मॅथ्यू कुहनेमन सिडनी सामन्यासाठी पुन्हा संघात आला आहे. दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी अॅडम झाम्पाला संधी देण्यात आली होती.
दरम्यान, कॅमरुन ग्रीनच्या जागी संधी मिळालेला मार्नस लाबुशेन याला संघातून रिलीज करण्यात आलं आहे.