Rishabh Pant Scott Boland Mitchell Starc : बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १८५ धावांवर आटोपला. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४० तर रवींद्र जाडेजाने झुंजार २६ धावांची खेळी केली. शेवटच्या टप्प्यात कर्णधार जसप्रीत बुमराहनेही २२ धावांची फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने ४ तर मिचेल स्टार्कने ३ बळी घेत भारताला द्विशतक गाठण्यापासून रोखले. भारताचे १० पैकी ९ फलंदाज झेलबाद झाले. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ९ धावा करत उस्मान ख्वाजाच्या रुपात १ बळी गमावला. बुमराहने त्याला माघारी धाडले.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिडनीच्या खेळपट्टीवर भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारे सलामवीर यशस्वी जैस्वाल (१०) आणि केएल राहुल (४) झटपट बाद झाले. 'कमबॅक' करणारा शुबमन गिल २० धावांवर आणि फॉर्मशी झुंजत असलेला विराट कोहली १७ धावांवर तंबूत परतला.
७२ धावांवर ४ विकेट्स गेल्यानंतर रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजा या दोघांमध्ये छोटेखानी भागीदारी झाली. भारताचे शतक ओलांडल्यानंतर मात्र फलंदाजी काहीशी गडबडली. रिषभ पंत ४० धावा काढून बाद झाला. पुढच्याच चेंडूवर गेल्या सामन्याचा शतकवीर नितीश रेड्डी शून्यावर माघारी परतला. जाडेजाने संघर्ष करत २६ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने १४ धावांची झुंज दिली. प्रसिध कृष्णादेखील ३ धावांवर बाद झाला. कर्णधार जसप्रीत बुमराहने फटकेबाजीचा प्रयत्न करत संघाला १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. बुमराह ३ चौकार आणि १ षटकार मारून २२ धावांवर बाद झाला.
नियमित कर्णधार रोहित शर्माला संघातून वगळलं...
या कसोटीसाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहितने स्वत:च सामन्यातून माघार घेतल्याची माहिती देण्यात आली. पण दुखापतग्रस्त नसताना एखाद्या संघाच्या नियमित कर्णधारालाच संघाबाहेर बसण्याची वेळ येणे ही क्रिकेटवर्तुळात नक्कीच चर्चेची बाब आहे. रोहितने गेल्या ३ कसोटीतील ५ डावांत ३१ धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती देण्यात आली असावी, अशीही चर्चा रंगली आहे.