सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यासाठी 13 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. रोहित शर्मा मुंबईत परतला असल्याने लोकेश राहुलला संधी देण्यात आली आहे. त्याच्यासह उमेश यादव, कुलदीप यादव आणि आर अश्विन यांनाही 13 जणांच्या चमूत स्थान देण्यात आले आहे. मात्र, या यादीत जलदगती गोलंदाज इशांत शर्माचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इशांतने या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना तीन सामन्यांत 13 विकेट घेतल्या आहेत. मेलबर्न कसोटीतील विजयात इशांतने तीन महत्त्वाच्या विकेट घेत मोलाचा वाटा उचलला होता. तरिही चौथ्या कसोटीत त्याला स्थान न मिळाल्याने नेटिझन्सने आश्चर्य व्यक्त केले आहे.
बीसीसीआयने इशांत संघात का नाही याचे उत्तर दिले.
बीसीसीआयने सांगितले की,''इशांतच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत.''
सिडनीची खेळपट्टी ही फिरकीपटूंना साथ देणारी आहे आणि त्यामुळे भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह खेळणार आहे. आर अश्विनच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह असल्याने सिडनीत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचे खेळणे पक्के मानले जात आहे. ऑस्ट्रेलियानेही या कसोटीसाठी संघात फिरकीपटू मार्नस लॅबसचॅग्नेला संधी दिली आहे.